दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत

By Admin | Updated: March 18, 2015 23:29 IST2015-03-18T23:29:16+5:302015-03-18T23:29:16+5:30

फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरच्या चार बळींमुळे द. आफ्रिकेने श्रीलंकेचा बुधवारी उपांत्यपूर्व सामन्यात नऊ गड्यांनी सहज पराभव करीत विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली.

South Africa in semifinals | दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत

दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत

डुुमिनीची हॅट्ट्रिक : अखेर ‘चोकर्स’चा डाग पुसला, लंका हतबल
सिडनी : पार्टटाईम गोलंदाज जेपी डुमिनी याने नोंदविलेली हॅट्ट्रिक तसेच फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरच्या चार बळींमुळे द. आफ्रिकेने श्रीलंकेचा बुधवारी उपांत्यपूर्व सामन्यात नऊ गड्यांनी सहज पराभव करीत विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली.
नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या लंकेला ३७.२ षटकांत १३३ धावांत गुंडाळणाऱ्या आफ्रिकेने १८ षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात विजयी उद्दिष्ट गाठले. दडपणाच्या ओझ्याखाली नेहमी गुडघे टेकणाऱ्या या संघाच्या विजयाने चोकर्स’चा डागही पुसून काढला आहे. ताहिरने ८.२ षटकांत २६ धावांत चार गडी बाद केले. आॅफ स्पिनर डुमिनीने सात षटकांत २९ धावांत तीन बळी घेतले. सध्याच्या विश्वचषकातील सहा डावांत केवळ ५३ धावा करणाऱ्या सलामीच्या क्वींटन डिकॉकने नाबाद ७८ धावा ठोकल्या. लसिथ मलिंगाला १२ वा चौकार ठोकून त्याने विजयावर शिक्कामोर्तब केले. डुप्लासिस २१ धावांवर नाबाद राहिला. २४ मार्च रोजी आफ्रिकेला उपांत्य सामन्यात न्यूझीलंड- वेस्ट इंडिज यांच्यातील शनिवारी खेळल्या जाणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यातील विजेत्याविरुद्ध खेळावे लागेल. या पराभवानंतर लंकेचे महान खेळाडू कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांनी वन डे क्रिकेटला अलविदा केले. २००७ आणि २०११ च्या उपविजेत्या संघाचे सदस्य असलेले हे दोन्ही खेळाडू यंदा जेतेपदासह निवृत्ती घेण्याच्या बेतात होते.
वन डे क्रिकेटमध्ये सलग चार शतके ठोकणारा एकमेव फलंदाज असलेल्या संगकाराने आज लंकेसाठी सर्वाधिक ४५ धावा केल्या. जयवर्धने चार धावा करू शकला. लंकेने चार धावांवर दोन फलंदाज गमावले होते. पण, संगकाराने लाहिरु तिरिमाने (४१) सोबत तिसऱ्या गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी करीत धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. (वृत्तसंस्था)
पण, पुढचे चार गडी नऊ चेंडू आणि दोन धावांत बाद झाल्याने लंकेची स्थिती ८ बाद ११६ अशी दयनीय झाली होती.
कुसाल परेरा ३, तिलकरत्ने दिलशान शून्य, माहेला ४, हे लवकर परतल्यानंतर डुमिनीने कर्णधार अँजेला मॅथ्यूज १९, नुवान कुलसेकरा १, थरिंडू कुशाल शून्य यांना बाद करीत हॅट्ट्रिक साधली. ३३ व्या षटकांत त्याने मॅथ्यूजला बाद केले. नंतर ३५ व्या षटकांत कुलसेकरा आणि कुशाला यांचा बळी घेत त्याने हॅट्ट्रिक पूर्ण केली. विश्वचषकात हॅट्ट्रिक साधणारा तो नववा गोलंदाज ठरला. पाकचा सकलेन मुश्ताक (१९९९) याच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फिरकीपटू ठरला.
दरम्यान ताहिरने तिसाराला बाद करीत लंकेच्या अडचणींत भर टाकली. लढतीदरम्यान पावसाने देखील हजेरी लावली. पाऊस कोसळण्याआधी संगकाराला मोर्केलने डिप थर्डमॅनवर झेल देण्यास बाध्य केले. काही मिनिटांत खेळ पुन्हा सुरू होताच ताहिरने लसिथ मलिंगाला बाद केले. (वृत्तसंस्था)

डुमिनीने नोंदविली हॅट्टीक
सिडनी : लंकेविरुद्ध उपांत्यपूर्व लढतीत लागोपाठ तीन बळी घेत द. आफ्रिकेचा आॅफ स्पिनर जेपी डुमिनीने हॅट्ट्रिक नोंदविली. डुमिनीने स्वत:च्या आठव्या आणि संघाच्या ३३ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर लंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याला डुप्लासिसकडे झेल देण्यास बाध्य केले.
यानंतर नवव्या आणि संघाच्या ३५ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर नुवान कुलसेकरा याला यष्टिरक्षक क्वींटन डिकॉक करवी झेलबाद केले. पुढच्या चेंडूवर त्याने कौशलला पायचीत करीत सध्याच्या विश्वचषकात हॅट्ट्रिक नोंदविण्याची किमया साधली.
२९ धावांत ३ बळी ही वन डे क्रिकेटमधील डुमिनीची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. यापूर्वी ३१ धावांत ३ बळी ही त्याची श्रेष्ठ कामगिरी होती. विश्वचषकात हॅट्ट्रिकची नोंद करणारा डुमिनी द. आफ्रिकेचा पहिलाच गोलंदाज आहे.

श्रीलंका : कुसाल परेरा झे. डिकॉक गो. एबोट ३, तिलकरत्ने दिलशान झे. डुप्लेसिस गो. स्टेन ०, कुमार संगकारा झे. मिलर गो. मोर्केल ४५, लाहिरु तिरिमाने झे. आणि गो. ताहीर ४१, माहेला जयवर्धने झे. डुप्लेसिस गो. ताहीर ४, अँजेलो मॅथ्यूज झे. डुप्लेसिस गो. डुमिनी १९, तिसारा परेरा झे. रोसोयू गो. ताहीर ०, नुवान कुलसेकरा झे. डिकॉक गो. डुमिनी १, लसिथ मलिंगा झे. मिलर गो. ताहीर ३, अवांतर : १५, एकूण : ३७.२ षटकांत सर्व बाद १३३ धावा. गोलंदाजी : स्टेन ७-२-१८-१, एबोट ६-१-२७-१, मोर्केल ७-१-२७-१, डुमिनी ९-१-२९-३, ताहीर ८.२-०-२६-४.

द. आफ्रिका : हाशिम आमला झे. कुलसेकरा गो. मलिंगा १६, क्वींटन डिकॉक नाबाद ७८, फाफ डुप्लासिस नाबाद २१, अवांतर : १९, एकूण : १८ षटकांत १ बाद १३४ धावा. गोलंदाजी : मलिंगा ६-०-४३-१, दिलशान २-०-१०-०, कुलसेकरा १-०-१३-०, कौशल ६-०-२५-०, चामिरा २-०-२९-०, परेरा १-०-१०-०.

Web Title: South Africa in semifinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.