श्रीलंकेचा पराभव करत दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये

By Admin | Updated: March 18, 2015 15:11 IST2015-03-18T09:03:27+5:302015-03-18T15:11:47+5:30

विश्वचषकाच्या बाद फेरीत श्रीलंकेवर नऊ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे.

South Africa defeated Sri Lanka in semi-finals | श्रीलंकेचा पराभव करत दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये

श्रीलंकेचा पराभव करत दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये

ऑनलाइन लोकमत

सिडनी, दि. १८ - विश्वचषकाच्या बाद फेरीत श्रीलंकेवर नऊ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे. श्रीलंकेचे १३४ धावांचे माफक आव्हान दक्षिण आफ्रिकेने १८ षटकांत एक गडी गमावून गाठले. श्रीलंकेच्या चार फलंदाजांना तंबूत धाडणारा फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. 

वर्ल्डकपमध्ये आजपासून बाद फेरीला सुरुवात झाली असून पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यात पहिला पार पडला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लंकेची सुरुवात निराशाजनक झाली. डेल स्टेन व केली एबोट या वेगवान गोलंदाजांनी सलामीवीर तिलकरत्ने दिलशान व कुशल परेरा या जोडीला अवघ्या ४ धावांवर तंबूत पाठवले. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये लागोपाठ चार शतकं ठोकणा-या कुमार संगकाराने  लाहिरु थिरीमानेच्या सोबत लंकेचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र लाहिरु ४१ धावांवर असताना बाद झाला. त्यानंतर एकाही फलंदाजाने संगकाराला साथ दिली नाही. महेल जयवर्धने, कर्णधार अँजेलो मॅत्यूज ,थिसारा परेरा, नुवान कुलसेकरा हे सर्वजण झटपट तंबूत परतले. संगकारा ४५ धावांवर असताना बाद झाला. श्रीलंकेच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. जे पी ड्यूमिनी व इम्रान ताहिरया फिरकी गोलंदाजांसमोर लंकेच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्कारली. ड्यूमिनीने तीन तर ताहिरने चार विकेट घेतल्या. 

श्रीलंकेचे माफक आव्हान घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी धडाकेबाज सुरुवात केली. सलामीवीर हाशीम आमला १६ धावांवर बाद झाला. त्यावेळी आफ्रिकेची स्थिती ६.४ षटकांत ४० अशी होती. यानंतर क्विंटन डीकॉकची ५७ चेंडूत नाबाद ७८ धावांची खेळी आणि फॅफ डू प्लेसिसची २१ धावांच्या खेळीने आफ्रिकेने सहज विजय मिळवला. श्रीलंकेचे आधारस्तंभ कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने या दोघांचा हा शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना ठरला. यानंतर दोघांनी एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती स्वीकारली आहे. आपल्या महत्त्वाच्या शिलेदारांना गोड निरोप देण्यात लंकेचा संघ पूर्णतः अपयशी ठरला.

ड्यूमिनीची हॅट्ट्रीक 

जेपी ड्यूमिनीने ३२ व्या षटकाच्या चेंडूवर अँजेलो मॅथ्यूजला बाद केले. यानंतर ३४ व्या षटकाच्या पहिल्या व दुस-या चेंडूवर ड्यूमिनीने कुलसेकरा व एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणा-या कौशलला बाद करत हॅट्ट्रीक साधली.   

Web Title: South Africa defeated Sri Lanka in semi-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.