सोमदेव-साकेत खेळणार पात्रता फेरीत
By Admin | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:46+5:302016-01-02T08:34:46+5:30
तमिळनाडू टेनिस संघाकडे (टीएनटीए) वाईल्ड कार्ड कोटा कमी असल्याने येत्या ४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एटीपी चेन्नई ओपन स्पर्धेसाठी भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू

सोमदेव-साकेत खेळणार पात्रता फेरीत
नवी दिल्ली : तमिळनाडू टेनिस संघाकडे (टीएनटीए) वाईल्ड कार्ड कोटा कमी असल्याने येत्या ४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या एटीपी चेन्नई ओपन स्पर्धेसाठी भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू सोमदेव देववर्मन व साकेत मायनेनी यांना पात्रता फेरीत खेळावे लागत आहे.
या स्पर्धेसाठी टीएनटीएकडे केवळ एक वाईल्ड कार्ड आहे. तर, इतर कार्डबाबत निर्णय स्पर्धेचे सहमालक आयएमजी यांच्याकडे आहे. या अव्वल खेळाडूंना वाईल्ड कार्डद्वारे स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, रामकुमार रामनाथन याला नशिबाची साथ मिळाली असून, त्याने मुख्य फेरीत स्थान मिळविले आहे.
विशेष म्हणजे, रशियाच्या कारेन काचनोव (१५२ रँकिंग), आंद्रेई रुबवेल (१७२ रँकिंग) यांना वाईल्डद्वारे मुख्य फेरीत प्रवेश देण्यात आले. १७०व्या स्थानी असलेल्या साकेतला मात्र वाईल्ड कार्ड मिळाले नाही. सोमदेव १७७व्या स्थानी आहे.
भारतीयांमध्ये केवळ युकी भांबरी विश्व क्रमवारीत ९३व्या स्थानी असल्याने थेट स्पर्धेत सहभागी होऊ शकला. मात्र, दुखापतीमुळे त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. टीएनटीएचे उपाध्यक्ष कांती चिदंबर म्हणाले, वाईल्ड कार्डविषयी टीएनटीए व आयएमजी परस्पर निर्णय घेतात. कधी टीएनटीला, तर कधी आयएमजीला दोन वाईल्ड कार्ड देण्याचा अधिकार असतो.