सिंधू, सायनाची विजयी सलामी
By Admin | Updated: March 30, 2017 01:16 IST2017-03-30T01:16:55+5:302017-03-30T01:16:55+5:30
पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या स्टार भारतीय शटलर्सनी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सकारात्कम सुरुवात

सिंधू, सायनाची विजयी सलामी
नवी दिल्ली : पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या स्टार भारतीय शटलर्सनी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सकारात्कम सुरुवात करताना विजयी सलामी नोंदवली. त्याचवेळी, पुरुष एकेरीत भारताच्या समीर वर्माने सुरुवातीलाच धक्कादायक निकाल नोंदवताना कोरियाच्या कसलेल्या सोन वान हो याला सरळ सेटमध्ये नमवून लक्ष वेधले.
सिंधूने सहज विजयी सलामी देताना आपल्या देशाच्या अरुंधती पंटावनेला २१-१७, २१-६ असे पराभूत केले. पहिल्या गेममध्ये चांगला खेळ केलेल्या अरुंधतीचा दुसऱ्या गेममध्ये सिंधूच्या धडाक्यापुढे काहीच निभाव लागला नाही. त्याचवेळी, दुसरीकडे स्टार खेळाडू सायनाने चीनी तैपईच्या चिया सिन ली हिचे आव्हान सहज परतावताना २१-१०, २१-१७ असा सरळ दोन गेममध्ये सामना जिंकला. गुडघा दुखापतीतून सावरल्यानंतर सिंधूने नेट जवळ केलेला आक्रमक खेळ लक्षवेधी ठरला.
दरम्यान पुरुष गटामध्ये समीरने सर्वांचे लक्ष्य वेधले. त्याने ४५ मिनिटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात चौथ्या मानांकीत कोरियाच्या सोन वानचे आव्हान २१-१७, २१-१० असे संपुष्टात आणून खळबळ माजवली. समीरचा पुढील सामना हाँगकाँगच्या हु युनविरुद्ध होईल.
अन्य सामन्यात भारताच्या साई प्रणीतनेही विजयी सलामी देताना जपानच्या केंटा निशिमोटोचे आव्हान १६-२१, २१-१२, २१-१९ असे परतावले. पुढील सामन्यात त्याच्यापुढे सातव्या मानांकीत चोई टिएन चेन याचे तगडे आव्हान असेल.
महिला दुहेरीमध्ये अश्विनी पोनप्पा - एन. सिक्की रेड्डी या भारतीय जोडीने चांगली सुरुवात करताना इंग्लंडच्या गॅब्रिएल एडकोक - जेसिका पुग यांना २१-१६, २१-१६ असे नमवले. (वृत्तसंस्था)