नेमबाज इलावेनिलचा विश्वविक्रमी ‘सुवर्णवेध’, अर्जुन बाबूताला कांस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 05:46 IST2018-03-23T05:46:28+5:302018-03-23T05:46:28+5:30
भारताची नेमबाज इलावेनिल वालारिवन हिने मोसमातील पहिल्याच ज्युनियर विश्वचषकात महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण जिंकून पात्रता फेरीत विश्वविक्रम नोंदविला.

नेमबाज इलावेनिलचा विश्वविक्रमी ‘सुवर्णवेध’, अर्जुन बाबूताला कांस्य
सिडनी : भारताची नेमबाज इलावेनिल वालारिवन हिने मोसमातील पहिल्याच ज्युनियर विश्वचषकात महिलांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण जिंकून पात्रता फेरीत विश्वविक्रम नोंदविला. इलावेनिलने श्रेया अग्रवाल तसेच जिना खट्टा यांच्यासोबत सांघिक प्रकारातही सुवर्णाची कमाई करून दिली. पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात अर्जुन बाबूता याला कांस्यवर समाधान मानावे लागले.
१८ वर्षांच्या इलावेनिलची अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ होती. तिने २४९.८ गुणांसह सुवर्ण जिंकले. त्याआधी पात्रता फेरीत ६३१.४ गुणांची नोंद केली. हा नवा विश्वविक्रम आहे.
विजयानंतर इलावेनिल म्हणाली,‘ मी आपल्या कामगिरीवर आनंदी आहे. सुवर्ण जिंकण्याची मला खात्री होती. हे पदक आईवडिलांना समर्पित करते.यासाठी मेहनत घेणारे गगनसर आणि जीएफजीतील कोचेसचे आभार.’ इलावेनिल ही आॅलिम्पिक कांस्य विजेता गगन नारंग यांच्या ‘गन फॉर ग्लोरी’ अकादमीत सराव करते. या प्रकारात चीनी तैपईची लिन यिंग शिन हिने रौप्य आणि चीनची वानग जेरू हिने कांस्य पदक जिंकले. श्रेया व जिना अनुक्रमे सहाव्या, सातव्या स्थानी घसरल्या. सांघिक गटात भारताने सुवर्ण जिंकले तर चायनीज तायपेईला रौप्य व चीनला कांस्य मिळाले. गतवर्षी आशियाई चॅम्पियनशिपचा सुवर्ण विजेता बाबूताला कांस्य मिळाले.
- गतवर्षी जर्मनीमध्ये झालेल्या ज्यूनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत इलावेनिलला
28
व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मात्र, वर्षभराच्या कठोर मेहनतीनंतर तिने स्वत:चे वर्चस्व निर्माण केले. ज्यूनिअर विश्वचषकच्या अंतिम फेरीत इलावेनिलला चीनी तैपईच्या लिन यिंग-शिनकडून कडवी लढत मिळाली. चीनच्या १८ वर्षीय वाँग जेरुने २२८.४ गुणांचा वेध घेत कांस्य पटकावले.