साश्रू नयनांनी ह्युजला निरोप
By Admin | Updated: December 4, 2014 01:55 IST2014-12-04T01:55:07+5:302014-12-04T01:55:07+5:30
क्रिकेट जगताने बुधवारी साश्रु नयनांनी आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्युज याला अखेरचा निरोप दिला. ह्युजची मॅक्सविले येथे अंत्ययात्रा काढण्यात आली

साश्रू नयनांनी ह्युजला निरोप
मॅक्सविले : क्रिकेट जगताने बुधवारी साश्रु नयनांनी आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्युज याला अखेरचा निरोप दिला. ह्युजची मॅक्सविले येथे अंत्ययात्रा काढण्यात आली, त्यावेळी क्रीडा जगतासह आॅस्ट्रेलियातील अनेक नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती. अवघ्या काही वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत ह्युजने केवळ संघ सहकाऱ्यांचाच नव्हे तर चाहत्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्याच्या या निधनाने प्रत्येकाच्या मनात एक पोकळी निर्माण झाली. ह्युजला निरोप देताना प्रत्येकजण ढसाढसा रडत होते.
ह्यूजच्या अंतिमसंस्काराचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. क्रिकेटला आयुष्य मानणाऱ्या आणि मैदानावरूनच जगाचा निरोप घेणाऱ्या २५ वर्षिय ह्युजला बुधवारी दफन करण्यात आले. केळ्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या छोट्याश्या मॅक्सविले शहरातून क्रिकेट कारकिर्द घडविणाऱ्या ह्युजच्या या निधनाने सर्वांच्या मनाला चटका लावला. आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू, कुटुंब, मित्र, नातेवाइक आणि चाहत्यांनी ह्युजला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. प्रत्येक जण आपापल्या परिने ह्युजच्या आठवणींना उजाळा देत होता. याच दरम्यान आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क आणि ह्युजचा मित्र याला पुन्हा अश्रु अनावर झाले.
हजारो नागरिकांमध्ये उपस्थित असलेल्या आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबोट यांनाही आपल्या भावनांवर आवर घालता आली नाही. यावेळी शेन वॉर्न, रिकी पॉटिंग, ग्लेन मॅकग्रा, ब्रायर लारा, रिचर्ड हेडली, विराट कोहली आदी दिग्गज क्रिकेटपटूंचीही उपस्थिती होती. ह्युजचे वडिल आणि भावासह क्लार्क, अॅरोन फिंच यांनी ह्युजच्या कॉफिनला खांदा दिला. याचे थेट प्रक्षेपण सिडनी क्रिकेट ग्राऊंडसह आॅस्ट्रेलियाच्या काही प्रमुख शहरांमध्ये मोठ्या स्क्रिनवर दाखविण्यात आले. गत आठवड्यात शैफिल्ड शील्डच्या सामन्यात ह्यूजचा चेंडू लागून मृत्यू झाला होता. आॅस्ट्रेलियन संघात कमबॅक करण्यासाठी उत्सुक असलेल्या ह्युजला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळाली होती, परंतु नियतिला हे मान्य नसावे. ह्युजच्या सन्मानार्थ अनेकांनी आपल्या घरा, कार्यालया आणि स्पोटर््स ग्राऊंडबाहेर बॅट ठेवल्या होत्या. ह्युजच्या अखेरच्या दर्शनावेळी त्याची बॅट कॉफिनजवळ ठेवण्यात आली होती. ह्युजनी अंत्ययात्रा सुरू झाल्यावर ‘डोंट लेट द सन गो डाऊन’ हे गाणेही वाजविण्यात आले. यात्रेपाठी आॅस्ट्रेलियन खेळाडू आणि मित्र परिवार होता, तसेच रस्त्याच्या दुतर्फा ह्युजला निरोप देण्यासाठी गर्दी जमली होती.