ऑस्ट्रेलियाचा शॉन टेट बनला 'भारतीय' नागरिक!
By Admin | Updated: March 22, 2017 17:36 IST2017-03-22T17:01:46+5:302017-03-22T17:36:38+5:30
स्टीव्ह वॉ, ब्रेट ली यांनी भारताविषयीच्या आपल्या भावना नेहमीच व्यक्त केल्या आहेत. आता यात अजून एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची भर पडली आहे

ऑस्ट्रेलियाचा शॉन टेट बनला 'भारतीय' नागरिक!
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंमध्ये मैदानात नेहमीच संघर्ष रंगत असतो. पण मैदानाबाहेर मात्र ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भारताचे आकर्षण असल्याचे वारंवार दिसून आले आहे. स्टीव्ह वॉ, ब्रेट ली यांनी भारताविषयीच्या आपल्या भावना नेहमीच व्यक्त केल्या आहेत. आता यात अजून एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची भर पडली आहे. तो क्रिकेटपटू आहे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज शॉन टेट. एकेकाळी आपल्या भन्नाट वेगाने प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या काळजात धडकी भरवणाऱ्या टेटने भारताचे नागरिकत्व स्वीकारले आहे. 19 मार्च रोजी टेट याला भारताची नागरिकता देण्यात आली असून, आता शॉन टेट भारतीय बनला आहे.
शॉन टेटने नुकतेच सोशल मीडियावरून याबाबतची माहिती जाहीर केली आहे. त्याने भारतीय नागरिकत्वाचे पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. एकेकाळी ब्रेट लीसोबत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या शॉन टेटने 2011 मध्येच कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. आता टेट फक्त ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये खेळतो. त्याने 2010 साली इंग्लंडविरुद्ध खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरा सर्वात वेगवान चेंडू टाकला होता.
विशेष म्हणजे शॉन टेटची पत्नीसुद्धा भारतीयच आहे. त्याने 2014 मध्ये भारतीय वंशाची मॉडेल माशूम सिंगा हिच्यासोबत विवाह केला होता. टेटने 3 कसोटीत पाच, 35 कसोटीत 62 बळी टिपले होते. तर ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 171 कसोटीत 218 बळी टिपले आहेत.
— Shaun Tait (@shaun_tait32) March 19, 2017