शास्त्री-नाईक वादावर करणार चर्चा

By Admin | Updated: October 27, 2015 23:54 IST2015-10-27T23:54:19+5:302015-10-27T23:54:19+5:30

भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना मुंबईत रविवारी पार पडला. मात्र, तरीही या सामन्यादरम्यान झालेले वाद काही संपण्यास तयार नाहीत.

Shastri-Naik debate will be discussed | शास्त्री-नाईक वादावर करणार चर्चा

शास्त्री-नाईक वादावर करणार चर्चा

मुंबई : भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना मुंबईत रविवारी पार पडला. मात्र, तरीही या सामन्यादरम्यान झालेले वाद काही संपण्यास तयार नाहीत. वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवरून भारतीय संघाचे निर्देशक रवी शास्त्री यांनी केलेल्या टीकेविरोधात क्युरेटर सुधीर नाईक यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (एमसीए) केलेल्या तक्रारीनंतर एमसीएनेही या प्रकरणाकडे लक्ष देण्याचे स्पष्ट केले आहे. शास्त्री यांनी अपशब्द वापरल्याची तक्रार नाईक यांनी एमसीएकडे केली आहे.
एमसीएचे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी यांनी सांगितले, की भारताचे माजी सलामीवीर आणि पिच क्युरेटर सुधीर नाईक यांची तक्रार मिळाली असून, त्या प्रकरणाबाबत एमसीए नक्की चर्चा करेल. नाईक यांनी केलेली तक्रार आमच्यापर्यंत पोहोचली असून, ३० आॅक्टोबरला होणाऱ्या एमसीएच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये या प्रकरणावर चर्चा होईल, असेही शेट्टी यांनी सांगितले. याच वेळी नाईक यांनी
आपल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्यांच्यात व शास्त्री यांच्यामध्ये वाद झाला होता.
या वेळी भारतीय क्रिकेट संघाच्या निर्देशकांनी अपशब्दांचा वापर करून त्यांचा अपमान केला होता. हे प्रकरण एमसीएच्या बैठकीत उपस्थित करण्यात येईल, असे एमसीएचे अन्य संयुक्त सचिव डॉ. उन्मेष खानविलकर यांनी सांगितले.
(वृत्तसंस्था)
नाईक यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे, की मुंबईत झालेल्या सामन्यादरम्यान शास्त्री यांनी खेळपट्टीविषयी विचारतानाच अपशब्दांचा वापर केला. तसेच, या वेळी गोलंदाजी प्रशिक्षक बी. अरुण यांनीही याविषयी नाईक यांचे सहकारी मामुनकर यांच्यावर राग काढला.
भारतीय संघ व्यवस्थापनाला या सामन्यासाठी फिरकीपटूंना अनुकूल अशी खेळपट्टी पाहिजे होती; मात्र अखेरच्या क्षणी ते अशक्य होते.
सोमवारी रात्री भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनीही नाईक-शास्त्री वादात बीसीसीआय लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर एमसीएनेसुद्धा हीच भूमिका घेतल्याने आता नक्की काय निर्णय होतो, याबाबत उत्सुकता लागली आहे.
एमसीएचे क्युरेटर सुधीर नाईक यांच्यावर टीका करताना रवी शास्त्रींनी भाषेची मर्यादा ओलांडली. त्यांनी ज्या पद्धतीने टीका केली, त्यातून आपल्याहून वरिष्ठ असलेल्या क्रिकेटपटूबद्दलचा अनादर दिसून येतो.
- संजय मांजरेकर,
माजी क्रिकेटपटू व समालोचक
घरच्या मैदानावर आपल्या मनासारखी खेळपट्टी जर मिळाली नाही. तर साहजिकच आहे संघ हताश होतो. परंतु भाषेवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. जेव्हा निराशा होते तेव्हा असे शब्द वापरले जातात. पण त्यावर नंतर खेद करण्यात अर्थ नाही. आधीच वक्तव्य व्यवस्थित करावे.
- सुनील गावसकर

Web Title: Shastri-Naik debate will be discussed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.