ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. १ - भारताने टी-२० मालिकेत ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात व्हाईट वॉश दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनने भारत आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे.
रविवारी झालेल्या तिस-या आणि शेवटच्या टी-२० सामन्यातही भारताने ऑस्ट्रेलियावर सात गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी करत वॉटसनने शतक झळकवून भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे महाकाय लक्ष्य ठेवले होते. मात्र भारताने हे लक्ष्यही पार करुन ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत व्हाईटवॉश दिला.
मोठा स्कोर करुनही आम्ही हरलो, हे खरोखरच निराशाजनक आहे. भारतीय फलंदाजांनी सर्वोच्च दर्जाची फलंदाजी केली. त्यांच्या संघात अनेक मॅचविनर आहेत. जे स्वत:च्या बळावर संघाला विजय मिळवून देऊ शकतात. आगामी टी-२० वर्ल्डकप भारतात होत असून, घरच्या मैदानावर भारतीय संघाला रोखणे कुठल्याही संघासाठी मोठे आव्हान असेल. भारताकडे वर्ल्डकप विजेतेपदाची क्षमता असून ते आगामी वर्ल्डकपमध्ये विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत असे वॉटसनने सांगितले.