सेरेना व मरे उपांत्य फेरीत
By Admin | Updated: April 3, 2015 00:27 IST2015-04-03T00:27:05+5:302015-04-03T00:27:05+5:30
तिस-या मानांकित ब्रिटनच्या अॅण्डी मरेने आॅस्ट्रेलियन टेनिसपटू डोमिनिक थिएमचा पराभव करीत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

सेरेना व मरे उपांत्य फेरीत
मियामी : तिस-या मानांकित ब्रिटनच्या अॅण्डी मरेने आॅस्ट्रेलियन टेनिसपटू डोमिनिक थिएमचा पराभव करीत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने मियामी टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत अंतिम चार खेळाडूंमध्ये स्थान निश्चित केले. मियामी टेनिस स्पर्धेत पुरुष विभागात मरे व बेर्दिच आणि महिला विभागात सेरेना व हालेप यांच्यादरम्यान लढती रंगणार आहेत.
मरेने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत डोमिनिकची झुंज ३-६, ६-४, ६-१ ने मोडून काढली. मरेला उपांत्य फेरीत चेक प्रजासत्ताकच्या टॉमस बेर्दिचच्या आव्हनाला सामोरे जावे लागणार आहे. मरेचा हा कारकिर्दीतील ५०१ वा विजय ठरला.
मरेला जागतिक क्रमवारीत ५२ व्या स्थानावर असलेल्या खेळाडूविरुद्धच्या लढतीत संघर्ष करावा लागला. आॅस्ट्रेलियन खेळाडूने बॅकहँडच्या फटक्यांचा मुक्तपणे वापर करीत पहिला सेट ६-३ ने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सूर गवसलेल्या मरेने थिएमची सर्व्हिस ब्रेक करीत ३-१ अशी आघाडी घेतली. निर्णायक सेटमध्ये मरेने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवत विजयावर शिक्कामोर्तब केले. आठव्या मानांकित बेर्दिचने अर्जेंटिनाच्या जुआन मोनाकोचा ६-३, ६-४ ने सहज पराभव केला. वर्षातील पहिल्या ग्रॅण्ड स्लॅम आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत बेर्दिच व मरे यांच्यादरम्यान उपांत्य फेरीत लढत झाली होती. त्यात स्कॉटिश खेळाडूने चार सेटमध्ये विजय मिळवला होता.
महिला विभागात अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विलियम्सला उपांत्य फेरी गाठताना घाम गाळावा लागला. बुधवारी कारकिर्दीतील ७०० वा विजय मिळवणाऱ्या सेरेनाने निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत जर्मनीच्या सबाईन लिसिकीचा ७-६, १-६, ६-३ ने पराभव केला.
सेरेनाला उपांत्य फेरीत रोमानियाच्या सिमोना हालेपच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. हालेपने तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या स्लोएन स्टिफन्सचा ६-१, ७-५ ने पराभव केला. यापूर्वी इंडियन वेल्स स्पर्धेतही हालेप व सेरेना यांच्यादरम्यान उपांत्य फेरीची लढत रंगणार होती, पण अमेरिकन खेळाडूने दुखापतीमुळे या लढतीतून माघार घेतली होती. यानंतर हालेपने येलेना यांकोविचचा पराभव करीत जेतेपद पटकावले होते. (वृत्तसंस्था)