सेहवागचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ‘गुडबाय’

By Admin | Updated: October 21, 2015 01:59 IST2015-10-21T01:59:57+5:302015-10-21T01:59:57+5:30

जगातील सर्वांत आक्रमक फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या वीरेंद्र सेहवागने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमिअर लीगमधून (आयपीएल) निवृत्ती स्वीकारण्याचा

Sehwag's international cricket 'goodbye' | सेहवागचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ‘गुडबाय’

सेहवागचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ‘गुडबाय’

नवी दिल्ली : जगातील सर्वांत आक्रमक फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या वीरेंद्र सेहवागने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमिअर लीगमधून (आयपीएल) निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सेहवागची एक दशकाची देदीप्यमान कारकिर्द समाप्त झाली.
मंगळवारी ३७वा वाढदिवस साजरा करणाऱ्या सेहवागने सोमवारी दुबईमध्ये एका कार्यक्रमादरम्यान निवृती स्वीकारण्याचे संकेत दिले होते; आणि त्यानंतर काही तासांनी त्याने तशी अधिकृत घोषणा केली.
सेहवाग म्हणाला, ‘‘मैदानावर आणि जीवनातही मला जे योग्य वाटले तेच मी केले. काही दिवसांपूर्वीच मी ३७व्या वाढदिवशी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचे निश्चित केले होते. मी या दिवशी कुटुंबीयांसोबत असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रत्येक प्रकार आणि आयपीएलमधून निवृत्ती स्वीकारत आहे.’’
सेहवाग पुढे म्हणाला, ‘‘क्रिकेट माझे जीवन असून, भविष्यातही राहणार आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा अनुभव संस्मरणीय ठरला. मी माझ्या सहकारी खेळाडूंना व भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मी बऱ्याच अंशी यशस्वी ठरलो, असे माझे मत आहे.’’
मी माझ्या सहकारी खेळाडूंचे आभार व्यक्त करतो. त्यातील काहींचा महान खेळाडूंमध्ये समावेश आहे. माझ्यावर विश्वास व्यक्त करणाऱ्या आणि माझी साथ देणाऱ्या माझ्या सर्व कर्णधारांचा मी आभारी आहे. त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. पुढील वर्षी होणाऱ्या मास्टर्स चॅम्पियन्स लीग २०२०मध्ये खेळण्याचा करार केल्यानंतर सेहवागने निवृत्तीचा निर्णय घेतला. या लीगमध्ये केवळ निवृत्ती स्वीकारणारे खेळाडूच सहभागी होऊ शकतात. काही दिवसांपूर्वीच वेगवान गोलंदाज झहीर खानने निवृत्तीची घोषणा केली होती. सेहवागला २०१३पासून भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. सेहवाग पुढे म्हणाला, ‘‘मी नेहमी महान खेळाडूंविरुद्ध खेळलो आणि ही अभिमानाची बाब आहे. जगातील शानदार मैदानावर खेळलो. मी मैदानावरील कर्मचारी, क्लब व मैदान तयार करण्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभाग असणाऱ्या सर्वांचे आभार मानतो.’’
नजफगडचा नबाब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेहवागने आपल्या कुटुंबातील सदस्य व प्रशिक्षकांचे आभार व्यक्त केले. मला आज माझ्या वडिलांची उणीव भासत आहे. ते माझ्या सुरुवातीच्या वाटचालीमध्ये सोबत होते. आज जर ते असते तर.. पण मला माहीत आहे की मी त्यांना निराश केले नाही. प्रशिक्षक ए.एन. शर्मा सरांचे आभार व्यक्त करतो. त्यांच्यामुळेच मला यश मिळविता आले. माझी आई, पत्नी आरती आणि मुले आर्यवीर व वेदान्त माझी सर्वांत मोठी शक्ती आहे. माझ्या जीवनात त्यांच्या उपस्थितीमुळे आत्मविश्वास निर्माण झाला आहे.’’ (वृत्तसंस्था)

लक्षवेधी...
सुरुवातीला सचिन तेंडुलकरचा ‘ड्युप्लिकेट’ म्हणून सर्वांचे लक्ष वेधले. दिसण्यात आणि खेळण्याची स्टाईल दोघांची एकसारखी असल्याची चर्चा रंगल्यानंतर सेहवागने सचिनची स्टाईल कॉपी करून खेळण्यास सुरुवात केल्याचे सांगितले.
कसोटी क्रिकेटमधील सलामीवीराची परिभाषा बदलण्यात सेहवागचे मोलाचे योगदान. प्रतिस्पर्ध्यांना एकदिवसीय सामन्याच्या तुलनेत कसोटीत सेहवागचा दरारा वाटत असे.
क्रिकेटमध्ये फूटवर्क महत्त्वाचे. परंतु सेहवागने फलंदाजी करताना फारशी पायांची हालचाल न करता स्वत:चा दबदबा निर्माण केला. स्क्वेअर कट आणि अप्पर कट यात सेहवागची मास्टरी. तसेच लेट कट खेळण्यात उजवा.

‘वीरू’चा दणका...
कसोटी क्रिकेटमध्ये ३१९ धावांची सर्वोच्च वैयक्तिक खेळी साकारणारा भारतीय फलंदाज.
कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकणारा एकमेव भारतीय फलंदाज. सेहवागने दोनवेळा त्रिशतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान त्रिशतक (२७८ चेंडंूत) आणि वेगवान २५० धावा (२०७ चेंडूंत) काढण्याचा विक्रम.
कसोटी क्रिकेट इतिहासात दोनवेळा त्रिशतक झळकावणाऱ्या जगभरातील चार फलंदाजांपैकी एक.
२०११ साली वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यात धमाकेदार द्विशतक ठोकताना सचिन तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा फलंदाज बनला.
एकदिवसीय सामन्यात द्विशतक आणि कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावणारा क्रिकेटजगतातील दोन फलंदाजांपैकी एक. दुसरा फलंदाज वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचा सदस्य.
सलामीवीर म्हणून एकदिवसीय व कसोटी अशा दोन्ही प्रकारांत ७५००हून अधिक धावा काढणारा एकमेव फलंदाज.
आॅस्टे्रलियाचे डॉन ब्रॅडमन आणि सेहवाग यांनीच आतापर्यंत कसोटी सामन्यात तीनवेळा २९०हून अधिक धावांची खेळी केली आहे.
कसोटी सामन्यात त्रिशतक आणि एका डावात अर्धा संघ बाद करण्याची कामगिरी करणारा एकमेव खेळाडू.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच डावात सलग दोनवेळा द्विशतकी भागीदारी करणारा एकमेव फलंदाज.
2008साली चेन्नई येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीला वासिम जाफरसह
213धावांची भागीदारी केल्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी राहुल द्रविडसह
268धावांची भागीदारी केली. यानंतर याच पराक्रमाची
2009साली श्रीलंकेविरुद्ध मुंबईत झालेल्या सामन्यात पुनरावृत्ती केली. मुरली विजयसह २२१ धावांची सलामी दिल्यानंतर राहुल द्रविडसह २३७ धावांची भागीदारी केली.

पुरस्कार
2002
अर्जुन पुरस्कार
2008-2009
विस्डेन सर्वोत्तम क्रिकेटर
2002
आयसीसी सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू
2010
पद्मश्री पुरस्कार

आंतरराष्ट्रीय पदार्पण
कसोटी
३ नोव्हेंबर २००१ दक्षिण आफ्रिकाविरुध्द (अखेरची कसोटी आॅस्टे्रलियाविरुध्द २ मार्च २०१३)
एकदिवसीय
१ एप्रिल १९९९ पाकिस्तानविरुध्द (अखेरचा सामना पाकिस्तानविरुध्द ३ जानेवारी २०१३)
टी-२०
१ डिसेंबर २००६ दक्षिण आफ्रिकाविरुध्द (अखेरचा सामना २ आॅक्टोबर २०१२ द. आफ्रिकाविरुध्द)
--------------------------

सचिन तेंडुलकरसारख्या महान खेळाडूच्या युगात खेळण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला नशीबवान समजतो. सचिन, द्रविड, गांगुली, कुंबळे, लक्ष्मण, श्रीनाथ, झहीर खान, एम.एस. धोनी, हरभजनसिंग आणि युवराज यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळाल्यामुळे मी नशीबवान आहे. यांच्याकडून बरेच शिकायला मिळाले. कसोटीमध्ये त्रिशतक झळकावणारा एकमेव भारतीय असा विचार मी कधीच केला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीचा आनंद आहे. नेहमी सकारात्मक विचार केल्यामुळेच मला धावा फटकावता आल्या. - वीरेंद्र सेहवाग

वेस्ट इंडिजचे माजी आक्रमक फलंदाज व्हिव रिचडर््स यांच्यानंतरचा विध्वंसक फलंदाज म्हणून मी वीरेंद्र सेहवागला पाहिले. तो शानदार आणि लक्षवेधी खेळाडू आहे.
- के. श्रीकांत, माजी क्रिकेटपटू

वीरेंद्र सेहवागने स्वत:च्या पद्धतीने क्रिकेट खेळले आहे. त्याचप्रमाणे त्याने स्वत:च्या मनाप्रमाणे जीवन जगले आहे. तो भारताच्या विजयातील हुकमी खेळाडू आहे.
- बिशनसिंग बेदी,
माजी क्रिकेटपटू

सेहवागच्या आजपर्यंतच्या कामगिरीसाठी मी त्याचे अभिनंदन करतो. त्याच्याविरोधात आणि त्याच्यासह खेळणे अभिमानास्पद होते. लवकरच पुन्हा त्याच्याशी भेट होईल.
- डेव्हिड वॉर्नर, आॅस्टे्रलिया

सलामीला खेळताना सेहवागसारखी फलंदाजी कोणीच करू शकणार नाही. लक्षवेधी कारकिर्दीसाठी सेहवागचे अभिनंदन. तो जबरदस्त संघसहकारी आहे. पुढील वाटचालीसाठी त्याला खूप शुभेच्छा.
- अनिल कुंबळे

व्हिव रिचर्ड्सला फलंदाजी करताना बघितले नाही, पण सेहवागला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांवर वर्चस्व गाजविताना बघितल्याचा अभिमान आहे. वीरूसारखी बेदरकार वृत्ती राखून फलंदाजी करणे कठीण आहे. त्याला एकेरी धाव घेण्यासाठी सांगत असताना तो चौकाराच्या प्रयत्नात असायचा. अनेक फलंदाज वीरूसारखे खेळण्यासाठी इच्छुक असतील, पण त्यांना सल्ला आहे की, फलंदाजीचा आनंद घ्यावा. वीरूचे अभिनंदन. - महेंद्रसिंग धोनी

सेहवागसोबत खेळण्याची संधी मिळणे आनंदाची बाब आहे. कारकिर्द शानदार होती. मार्गदर्शन व संस्मरणीय आठवणींसाठी आभार. तो वर्तमान काळातील महान फलंदाज आहे.
- विराट कोहली

खराखुरा सलामीवीर, द डेअरडेव्हिल. वीरू पाजी या शानदार वाटचालीसाठी अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा.
- शिखर धवन

शानदार कारकिर्दीसाठी अभिनंदन. वीरू तू मैदानावर आनंद साजरा करण्याच्या अनेक संधी दिल्या. या सर्व आठवणींसाठी आभार.
- व्हीव्हीएस लक्ष्मण

Web Title: Sehwag's international cricket 'goodbye'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.