सरफराजचे शतक व्यर्थ
By Admin | Updated: August 28, 2016 05:20 IST2016-08-28T05:20:49+5:302016-08-28T05:20:49+5:30
लॉर्डस् मैदानावर वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक ठोकणारा पहिला पाकिस्तानी फलंदाज ठरलेल्या सरफराज अहमदच्या शानदार खेळीनंतरही इंग्लंडने पाकिस्तानवर

सरफराजचे शतक व्यर्थ
लंडन : लॉर्डस् मैदानावर वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक ठोकणारा पहिला पाकिस्तानी फलंदाज ठरलेल्या सरफराज अहमदच्या शानदार खेळीनंतरही इंग्लंडने पाकिस्तानवर ४ विकेटसनी विजय मिळवला. पाकने दिलेले २५५ धावांचे आव्हान यजमान इंग्लंडने ६ विकेटसच्या मोबदल्यात १५ चेंडू शिल्लक ठेवून पूर्ण केले.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यांची सुरुवातीला ३ बाद २ धावा अशी नाजूक अवस्था होती. त्यानंतर सरफराजने १३० चेंडूंना सामोरे जाताना १०५ धावांची खेळी केली. इमाद वसीमने कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करताना नाबाद ६३ धावा फटकावल्या. त्याने सरफराजसोबत सहाव्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली. त्याआधी, सरफराजने बाबर आजमसोबत (३०) चौथ्या विकेटसाठी ६४ आणि शोएब मलिकसोबत (२८) पाचव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली.
इंग्लंडतर्फे वेगवान गोलंदाज ख्रिस व्होक्स व मार्क वुड यांनी अनुक्रमे ४२ व ४६ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी ३ बळी घेतले.
पाकची सुरुवात निराशाजनक झाली. दुसऱ्याच षटकात व्होक्सच्या गोलंदाजीवर समी असलम (१) बाद झाला. वुडने शारजील खान (०) याला बोल्ड केले. त्यानंतरच्या षटकात व्होक्सने कर्णधार अजहर अली (०) याला तंबूचा मार्ग दाखविला. सरफराज व बाबर यांनी त्यानंतर डाव सावरला. लियाम प्लंकेटने बाबरला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. शोएब मलिकने काही वेळ सरफराजची साथ दिली, पण फिरकीपटू मोईन अलीने त्याला बाद करीत ही जोडी फोडली. सरफराजने प्लंकेटच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत कारकिर्दीत दुसऱ्यांदा शतक ठोकले. त्याची शतकी खेळी मोईन अलीने संपविली. (वृत्तसंस्था)