बांगलादेशला संजीवनी

By Admin | Updated: March 5, 2015 23:23 IST2015-03-05T23:23:52+5:302015-03-05T23:23:52+5:30

चार फलंदाजांच्या अर्धशतकांच्या बळावर व्यावसायिक खेळाचा सुंदर नमुना सादर करणाऱ्या बांगलादेशने विश्वचषकात गुरुवारी स्कॉटलंडचा सहा गड्यांनी पराभव केला.

Sanjivani in Bangladesh | बांगलादेशला संजीवनी

बांगलादेशला संजीवनी

कोएत्झरचे दीडशतक व्यर्थ : स्कॉटलंडवर सहा विकेटनी विजय
नेल्सन : तमीम इक्बालच्या नेतृत्वात आघाडीच्या चार फलंदाजांच्या अर्धशतकांच्या बळावर व्यावसायिक खेळाचा सुंदर नमुना सादर करणाऱ्या बांगलादेशने विश्वचषकात गुरुवारी स्कॉटलंडचा सहा गड्यांनी पराभव केला. कोएत्झरच्या १५६ धावांमुळे स्कॉटलंडने ठेवलेले ३१९ धावांचे लक्ष्य बांगलादेशने ४८.१ षटकांत ४ बाद ३२२ असे गाठले. वन डे क्रिकेटमध्ये संघाने गाठलेले हे विक्रमी लक्ष्य ठरले. या विजयामुळे बांगलादेशच्या उपांत्यपूर्व फेरीच्या आशा जिवंत आहेत.
कोएत्झरने १३४ चेंडूंवर १५६ धावा ठोकल्या होत्या, पण स्कॉटलंडच्या पराभवामुळे त्याचा शतकी झंझावात व्यर्थ ठरला. बांगलादेशच्या विजयात तमिम इक्बाल ९५, महमंदुल्लाह ६२, मुशफिकर रहीम ६० आणि शाकिब अल हसन नाबाद ५२ यांनी अर्धशतकी खेळी केली. शब्बीरने जलद नाबाद ४२ धावा केल्या. विश्वचषकात मोठे लक्ष्य गाठण्यात बांगलादेश दुसऱ्या स्थानावर आहे. हा विक्रम आयर्लंडच्या नावावर आहे. आयर्लंडने इंग्लंडविरुद्ध २०११ मध्ये ३२८ धावांचे लक्ष्य गाठले होते. बांगलादेशचे चार सामन्यांत पाच गुण झाले असून ‘अ’ गटात हा संघ चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध अद्याप सामने खेळायचे आहेत. यापैकी एक विजय मिळाल्यास बांगलादेशचे उपांत्यफेरीमध्ये स्थान निश्चित होईल.
स्कॉटलंडने विश्वचषकात अद्याप विजयाचे खाते उघडले नाही. तिसऱ्यांदा स्पर्धेत खेळणाऱ्या या संघाने सर्व १२ सामने गमावले. सध्या चारही सामन्यांत हा संघ पराभूत झाला आहे. बांगलादेशने याआधी विश्वचषकात कधीही ३०० धावा केल्या नव्हत्या. आजही सौम्या सरकार (२) हा झटपट बाद झाल्यानंतर तमीम आणि महमंदुल्लाह यांनी दुसऱ्या गड्यासाठी १३९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर तमीमने तिसऱ्या गड्यासाठी मुशफिकरसोबत ५७ धावा ठोकल्या. तमीम विश्वचषकात पहिले शतक साजरे करणार तोच २५ वर्षांच्या या फलंदाजाला डेव्हीने पायचित केले. त्याने १०० चेंडू खेळले. त्यात नऊ चौकार व एक षट्कार होता. मुशफिकरने ४२ चेंडूंत सहा चौकार व दोन षट्कारांसह ४२ धावा केल्या.
रहमान आणि शाकिब यांनी पाचव्या गड्यासाठी नाबाद ७५ धावा ठोकून लक्ष्य गाठले. शाकिबने ४१ चेंडूंत पाच चौकार व एक षट्कार तसेच रहमानने ४० चेंडू खेळून चार चौकार व दोन षट्कार खेचले. त्याआधी स्कॉटलंडच्या डावाला कोएत्झरने आकार दिला. करिअरमधील दुसऱ्या शतकाची नोंद करणाऱ्या कोएत्झरलाच ‘सामनावीरा’चा पुरस्कार बहाल करण्यात आला. (वृत्तसंस्था)

१५६
कोएत्झरने केलेल्या आजच्या धावा या कसोटी दर्जा नसलेल्या संघातील खेळाडूच्या वर्ल्डकपमधील सर्वोच्च धावा आहेत. यापूर्वी २००३ च्या विश्वचषकात नेदरलॅँडच्या जान वॅन नोर्टूविज्क याने १३४ धावा केल्या होत्या.

१४१
धावांची भागीदारी कोएत्झर आणि प्रेस्टन मोमसेन यांनी आज नोंदविली. स्कॉटलंडकडून वर्ल्डकपमध्ये झालेली ही सर्वोच्च भागीदारी आहे.

स्कॉटलंड : काईल कोएत्झर झे. सरकार गो. नासिर हुसेन १५६, मॅक्लॉईड झे. महमंदुल्लाह गो. मूर्तझा ११, हामिश गार्डिनर झे. सरकार गो. तास्किन अहमद १९, मॅट मचान झे. आणि गो. रहमान ३५, प्रेस्टन मोमसेन झे. सरकार गो. नासिर हुसेन ३९, रिची बॅरिंग्टन झे. रहीम गो. तास्किन अहमद २६, मॅथ्यू क्रॉस झे. शब्बीर गो. तास्किन अहमद २०, जोस डेव्ही नाबाद ४, माजिद हक झे. सरकार गो. शकिब हसन १, इव्हान्स नाबाद ००, अवांतर ७, एकूण : ५० षटकांत ८ बाद ३१८ धावा.
गडी बाद क्रम : १/१३, २/३८, ३/११६, ४/२५७, ५/२६९, ६/३१८, ७/३१२, ८/३१५.
गोलंदाजी : शकिब अल हसन १०-०-४६-१, तास्किन अहमद ७-०-४३-३, रुबेल हुसेन ८-०-६०-०, महमंदुल्लाह ५-०-२९-०, शब्बीर रहमान ७-०-४७-१, नासिर हुसेन ५-०-३२-२.

बांगला देश : तमिम इक्बाल पायचित गो. डेव्ही ९५, सौम्या सरकार झे. क्रॉस गो. डेव्ही २, महमंदुल्लाह त्रि. गो. वार्डलॉ ६२, मुशफिकर रहीम झे. मॅक्लॉईड गो. इव्हान्स ६०, शाकिब अल हसन नाबाद ५२, शब्बीर रहमान नाबाद ४२, अवांतर : ९. एकूण : ४८.१ षटकांत ४ बाद ३२२ धावा.
गडी बाद क्रम :१/५, २/१४४, ३/२०१, ४/२४७.
गोलंदाजी : वार्डलॉ ९.१-०-७५-१, डेव्ही १०-०-६८-२, इव्हान्स १०-१-६७-१, मचान ७-०-४५-०, हक १०-०-४९-०, बॅरिंग्टन २-०-१८-०.

Web Title: Sanjivani in Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.