सानिया ‘खेलरत्न’ची दावेदार!

By Admin | Updated: July 19, 2015 00:37 IST2015-07-19T00:37:12+5:302015-07-19T00:37:12+5:30

जागतिक क्रमवारीतील दुहेरीची नंबर वन खेळाडू, विम्बल्डन महिला दुहेरी चॅम्पियन टेनिसस्टार सानिया मिर्झा ही यंदा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने

Sania 'Khel Ratna' claimant! | सानिया ‘खेलरत्न’ची दावेदार!

सानिया ‘खेलरत्न’ची दावेदार!

नवी दिल्ली : जागतिक क्रमवारीतील दुहेरीची नंबर वन खेळाडू, विम्बल्डन महिला दुहेरी चॅम्पियन टेनिसस्टार सानिया मिर्झा ही यंदा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित होऊ शकते.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची सानियाच्या नावाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याची योजना आहे. खेलरत्न पुरस्कार दर वर्षी २९ आॅगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रपती अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांसोबत प्रदान करतात. गतवर्षी एकाही खेळाडूला खेलरत्न पुरस्कार देण्यात आला नव्हता.
सानिया मिर्झाने केलेल्या शानदार कामगिरीमुळे तिला खेलरत्न पुरस्कार देण्याचा क्रीडा मंत्रालय गांभीर्याने विचार करीत आहे. प्राप्त माहितीनुसार, ९ खेळाडूंनी खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज केला आहे. त्यांत दीपिका पल्लीकल (स्क्वॅश), सीमा अंतिल (डिस्कस थ्रो), विकास गौडा (डिस्कस थ्रो), सरदारसिंग (हॉकी), टिंटू लुका (अ‍ॅथलेटिक्स), अभिषेक वर्मा (धनुर्विद्या), गिरीशा एच. एन. (पॅरालिम्पियन हायजंपर), पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन) आणि जीव मिल्खासिंग (गोल्फ) यांचा समावेश आहे. सानियाला २००४मध्ये अर्जुन पुरस्कार आणि २००६मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. तिने गतवर्षी
आशियाई क्रीडास्पर्धेत साकेत मिनेनी याच्या साथीने मिश्र दुहेरीत सुवर्ण आणि प्रार्थना ठोंबरे हिच्या साथीने महिला दुहेरीत कांस्यपदक जिंकले.
हैदराबादच्या सानियाने गतवर्षी यूएस ओपनमध्ये ब्राझीलच्या ब्रूनो सोरेस याच्या साथीने मिश्र दुहेरीत अजिंक्यपद पटकावले होते. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रत्येक वर्षी एकाच खेळाडूला दिला जातो. २००८मध्ये महिला बॉक्सर एम. सी. मेरी कोम आणि मुष्टियोद्धा विजेंदरसिंह व पैलवान सुशीलकुमार, तसेच २०१२मध्ये योगेश्वर दत्त यांना खेलरत्न पुरस्कार मिळाला होता.

हिंगीसची साथ
सानिया या वर्षी एप्रिलमध्ये जागतिक क्रमवारीत दुहेरीची नंबर वन खेळाडू बनली आहे. सध्या ती स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीससोबत महिला दुहेरीत खेळते. हिंगीसच्याच साथीने विम्बल्डनचे महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. सानियाने वैयक्तिक पातळीवर खेलरत्न पुरस्कारासाठी अर्ज केला नाही.

Web Title: Sania 'Khel Ratna' claimant!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.