संगकाराचा शतकी चौकार, स्कॉडलंड पराभूत
By Admin | Updated: March 11, 2015 16:55 IST2015-03-11T16:35:20+5:302015-03-11T16:55:30+5:30
कुमार संगकारांने वर्ल्डकपमध्ये लागोपाठ चौथे शतक ठोकल्याने श्रीलंकेने स्कॉटलँडवर १४८ धावांनी दणदणीत विजय मिळवत गुणतालिकेत दुस-या क्रमांकावर झेप घेतली.

संगकाराचा शतकी चौकार, स्कॉडलंड पराभूत
>ऑनलाइन लोकमत
होबार्ट, दि. ११ - कुमार संगकारांने वर्ल्डकपमध्ये लागोपाठ चौथे शतक ठोकल्याने श्रीलंकेने स्कॉटलँडवर १४८ धावांनी दणदणीत विजय मिळवत गुणतालिकेत दुस-या क्रमांकावर झेप घेतली. कुमार संगकाराने फलंदाजीसोबतही यष्टीमागेही कमाल दाखवत विक्रम रचला आहे.
वर्ल्डकपमध्ये बुधवारी श्रीलंका विरुद्ध स्कॉटलंड यांच्यात सामना पार पडला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर लाहिरु थिरीमाने स्वस्तात बाद झाल्याने श्रीलंकेची स्थिती १ बाद २१ धावा अशी झाली. मात्र त्यानंतर तिलकरत्ने दिलशान १०४ धावा आणि या वर्ल्डकपमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असणारा कुमार संगकाराच्या १२४ धावांच्या खेळीने श्रीलंकेला मजबूत स्थितीत नेले. या जोडीने दुस-या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी रचली. कर्णधार अँजेलो मॅथ्यूजच्या ५१ धावांच्या तडाखेबाज खेळीन श्रीलंकेने ५० षटकांत ९ गडी गमावत ३६३ धावा केल्या.
श्रीलंकेने दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या स्कॉटलंडच्या फलंदाजांना लंकेच्या मा-यासमोर तग धरता आले नाही. कर्णधार प्रेस्टन मोमसेन ६० धावा व फ्रेडी कोलमनच्या ७० धावावगळता उर्वरित सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले. स्कॉटलंडचा डाव ४३.१ षटकांत २१५ धावांवर आटोपला. लंकेतर्फे नुवान कुलसेकरा व दुष्मथा चमीरा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर लासीथ मलिंगाने दोन विकेट घेतल्या.
संगकाराचा विक्रम
संगकाराने लागोपाठ चार शतक ठोकून विश्वविक्रम रचला. संगकाराचे हे २५ वे शतक आहे. या सामन्यात संगकाराने विकेट किपर म्हणून वर्ल्डकपमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला. संगकाराने वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक झेल टिपणारा विकेटकिपर बनला असून त्याने ३६ मॅचमध्ये यष्टीमागे ५४ विकेट घेतल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर होता.