सायना-सिंधू आमने-सामने

By Admin | Updated: May 25, 2015 02:50 IST2015-05-25T02:50:43+5:302015-05-25T02:50:43+5:30

तीन वेळची चॅम्पियन सायना नेहवाल आणि तिच्याच देशाची भारतीय पी. व्ही. सिंधू या पुढील महिन्यात होणाऱ्या ८,00,000 डॉलर बक्षीस रकमेच्या

Saina-Sindhu face-to-face | सायना-सिंधू आमने-सामने

सायना-सिंधू आमने-सामने

जकार्ता : तीन वेळची चॅम्पियन सायना नेहवाल आणि तिच्याच देशाची भारतीय पी. व्ही. सिंधू या पुढील महिन्यात होणाऱ्या ८,00,000 डॉलर बक्षीस रकमेच्या इंडोनेशियन ओपन सुपर सीरिज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत आमने-सामने उभे ठाकण्याची शक्यता आहे.
जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सायनाला या प्रतिष्ठित स्पर्धेत द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. तिने २००९, २०१० आणि २०१२ मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. जागतिक क्रमवारीतील १२ व्या मानांकित सिंधूला २ जूनपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत मानांकन देण्यात आलेले नाही. आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना आपल्या अभियानाची सुरुवात थायलंडच्या निचाओन जिंडापोन याच्याविरुद्धच्या सामन्याने करेल. सायनाला या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विजय मिळविण्यात फारसे कष्ट पडणार नाहीत. कारण यांच्यात आतापर्यंत झालेले तिन्हीही सामने भारतीय खेळाडूने जिंकले आहेत.
जागतिक स्पर्धेत दोनवेळेस कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूला पहिल्या फेरीत चीन तैपेईच्या सु या चिंग हिच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. हैदराबादच्या या खेळाडूने जागतिक क्रमवारीतील २७ व्या मानांकित खेळाडूला नमवल्यास तिला दुसऱ्या फेरीत सायनाचा सामना करावा लागेल. (वृत्तसंस्था)

Web Title: Saina-Sindhu face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.