सायना नेहवाल मलेशिया ओपनसाठी सज्ज
By Admin | Updated: April 5, 2016 00:37 IST2016-04-05T00:37:13+5:302016-04-05T00:37:13+5:30
इंडिया ओपन स्पर्धेत उपांत्य सामन्यात आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारताची फुलराणी सायना नेहवाल मंगळवारपासून पात्रता फेरीसह सुरू होणाऱ्या मलेशिया

सायना नेहवाल मलेशिया ओपनसाठी सज्ज
शाह आलम : इंडिया ओपन स्पर्धेत उपांत्य सामन्यात आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारताची फुलराणी सायना नेहवाल मंगळवारपासून पात्रता फेरीसह सुरू होणाऱ्या मलेशिया ओपन स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. दुसऱ्या बाजूला भारताचा बलाढ्य पुरुष खेळाडू किदांबी श्रीकांत हाही या स्पर्धेत चमकदार कामगिरीच्या निर्धाराने उतरेल.
अटीतटीच्या सामन्यात कामगिरी उंचावण्याच्या प्रयत्नात भारतीय खेळाडू असतील. या स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होईल. पायाच्या दुखापतीतून सावरल्यानंतर सायना इंडिया ओपनमध्ये आपले विजेतेपद कायम राखण्यात
अपयशी ठरली. उपांत्य सामन्यात
तिने चीनच्या ली शुएरुईला कडवी झुंज दिली; मात्र मोक्याच्या वेळी २ गुण गमावल्याने सायनाला स्पर्धेबाहेर जावे लागले.
मलेशिया ओपनमध्ये सलामीला सायनाची लढत थायलंडच्या निचाओन जिंदापोलविरुद्ध होईल. जिंदापोलविरुद्ध सायनाने ५ सामने जिंकले असून, इंडिया ओपनच्या दुसऱ्या फेरीतही सायनाने तिच्याविरुद्ध बाजी मारली आहे.
दुसरीकडे, सुपर सिरीज स्पर्धेत कामगिरी उंचावण्याचे मुख्य आव्हान श्रीकांतपुढे असेल. गेल्या वर्षी इंडिया ओपन किताब पटकावल्यानंतर कोणत्याही सुपर सिरीज स्पर्धेत श्रीकांत दुसऱ्या फेरीचा पडाव पार करू शकलेला नाही. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात इंडिया ओपनमध्ये पहिल्याच फेरीत त्याला गाशा गुंडाळावा लागला होता. यामुळे त्याच्या रँकिंगमध्ये फटका बसू
शकतो. तसेच, आॅलिम्पिक प्रवेश निश्चित करण्याच्या त्याच्या स्वप्नांनाही धक्का बसू शकतो. मलेशिया ओपनमध्ये सलामीला श्रीकांतला थायलंडच्या बुनसाक पोनसाकाविरुद्ध लढायचे असून, त्याच्याविरुद्ध श्रीकांतने ४ सामन्यांत ३ वेळा विजय मिळविला आहे.
त्याचबरोबर, दोन वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावणारी पी. व्ही. सिंधू गेल्या काही स्पर्धांत आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरली आहे. मलेशिया ओपनमध्ये ती चीनच्या बिंगजियाओविरुद्ध
आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. शिवाय, अजय जयराम, एच. एस. प्रणय यांच्यावरही भारताची मदार आहे. (वृत्तसंस्था)