सचिनच्या फलंदाजांना ‘टिप्स’
By Admin | Updated: February 12, 2015 02:04 IST2015-02-12T02:04:45+5:302015-02-12T02:04:45+5:30
विश्वचषकापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने टीम इंडियातील फलंदाजांना काही विशेष ‘टिप्स’ दिल्या. याशिवाय त्याने आॅस्ट्रेलिया

सचिनच्या फलंदाजांना ‘टिप्स’
मेलबोर्न : विश्वचषकापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने टीम इंडियातील फलंदाजांना काही विशेष ‘टिप्स’ दिल्या. याशिवाय त्याने आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंडच्या आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर यश मिळविण्याचा मूलमंत्रही सांगितला.
क्रिकेट विश्वातील सर्वाधिक यशस्वी फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिनने १९९९ ते २०११ या दरम्यान तब्बल ६ विश्वचषक खेळले. सचिन पहिल्यांदा १९९२च्या विश्वचषकात खेळला होता. आयसीसीसाठी लिहिलेल्या विश्वचषक स्तंभात सचिन म्हणतो, ‘पर्थ आणि ब्रिस्बेनच्या खेळपट्ट्या वेगवान आणि उसळी घेणाऱ्या आहेत. या खेळपट्ट्यांवर अनुभवहीन फलंदाजांच्या उणिवा चव्हाट्यावर येतील. गोलंदाज आणि फलंदाजांना चुका करण्यास येथे वाव नसतो. फलंदाज जर वेग आणि चेंडूची उसळी समजत असतील तर ते कुठल्याही गोलंदाजावर वर्चस्व गाजवू शकतील.’
नोव्हेंबर २०१३मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर करणारा सचिन ‘फलंदाजांनी न्यूझीलंडमध्ये वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यांपासून सावध राहावे,’ हे सांगायलादेखील विसरला नाही. तो म्हणाला, ‘‘तेथील वारे इतके जलद असतात, की फलंदाजांना टायमिंगने ‘स्ट्रोक्स’ खेळणेदेखील अवघड होते.’’ विश्वचषकातील ४५ सामन्यांत सर्वाधिक २,२७८ धावा काढणाऱ्या सचिनने २०११च्या स्पर्धेत ९ सामन्यांत ४८२ धावा केल्या होत्या.
न्यूझीलंडमधील मैदानांचे वैशिष्ट्य सांगताना सचिन लिहितो,‘‘न्यूझीलंडमधील मैदाने पारंपरिक गोल नाहीत. आॅस्ट्रेलियात अॅडिलेड ओव्हलची सीमारेषा पॉर्इंट आणि स्क्वेअर लेगवर लहान असते. सरळ असलेली सीमारेषा मात्र लांबलचक आहे. पाहुण्या संघांसाठी हे आव्हान असेल. यामुळे फिल्डिंग पोझिशन तसेच गोलंदाजातील डावपेचांवर फरक पडतो. आॅस्ट्रेलियात मोठ्या मैदानांवर सीमारेषादेखील मोठी आहे. १९९९च्या मालिकेत फुल बाऊंड्री होती. मी रिकी पाँटिंगच्या बाऊंड्रीवरून केलेल्या थ्रोवर चौथी धाव घेतली होती. रिकीच्या तगड्या थ्रोनंतरही आम्ही चार धावा घेण्यात यशस्वी ठरलो. चेंडू विकेटकीपरपर्यंत येण्यास वेळ लागतो, याची जाणीव होतीच.’’ खराब फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांसाठी सर्कलमध्ये अतिरिक्त फिल्डर ही एक समस्या असते. ‘स्ट्राईक रोटेट’ करणेदेखील कठीण होऊन बसते. दुसरीकडे, फॉर्ममध्ये असलेले दोन फलंदाज खेळपट्टीवर असतील तर गोलंदाजांवर संकट ओढवते. टीम इंडियाने या बाबी ध्यानात घ्याव्यात, असे सचिनने बजावले आहे. (वृत्तसंस्था)