Runner Kavita Raut is still waiting for a job; Finally the governor knocked on the door | धावपटू कविता राऊत अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत; अखेर राज्यपालांचे दरवाजे ठोठावले

धावपटू कविता राऊत अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत; अखेर राज्यपालांचे दरवाजे ठोठावले

नाशिक  :  राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकासह थेट ऑलिम्पिकपर्यंत धडक देऊन नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचवणारी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या पदरी शासन दरबारी अद्यापच निराशा पडली आहे. सर्व प्रकारची पात्रता असूनही शासकीय सेवेत प्रथम श्रेणीच्या अधिकारी म्हणून नोकरी दिली जात नसल्याने कविताने अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन तिचे गाऱ्हाणे मांडले. 

सावरपाड्यातील आदिवासी कन्येने दीड दशकांपासून राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये ठसा उमटवला होता. २०१० साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत कविताने रौप्य पदकाला गवसणी घातली. त्याबद्दल कविताला खेळाडूंसाठी देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. 

शैक्षणिक क्षेत्रांत इयत्ता पाचवीच्या बालभारतीच्या पुस्तकात धावपटू कविता राऊत यांच्या संघर्षकथेचा प्रवास मांडण्यात आला आहे. 
२०१४ पासून वर्ग एकच्या पदासाठी शासकीय सेवेत नोकरी मिळावी, म्हणून कविता राऊतने अर्ज केला होता. कवितानंतर अर्ज केलेल्या काही खेळाडूंची वर्ग एकच्या पदावर नियुक्ती झाली. कविताला मात्र, अजूनही नोकरीची प्रतीक्षाच आहे. त्या पार्श्वभूमीवर नोकरीसंदर्भात होत असलेल्या अन्यायाची कैफियत कविता राऊतने राज्यपाल भगतसिंग कोश्यारींपुढे मांडली. 

राज्यपालांना भेटणं हा माझा शेवटचा पर्याय होता. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून माझ्या कामात अडचणी येत आहेत. माझी फाइल तिथून पुढे सरकत नाही. २०१८ मध्ये ज्या ३३ खेळाडूंची यादी निघाली होती, त्यातही माझं नाव नव्हतं. ग्रामीण भागांतील खेळाडूंसाठी मला काम करायचं आहे. - कविता राऊत, आंतरराष्ट्रीय धावपटू

Web Title: Runner Kavita Raut is still waiting for a job; Finally the governor knocked on the door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.