आॅस्ट्रेलियन ‘स्पीड’ला भिडणार : रोहित शर्मा
By Admin | Updated: October 6, 2014 03:19 IST2014-10-06T03:19:50+5:302014-10-06T03:19:50+5:30
आॅस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे मत भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे़

आॅस्ट्रेलियन ‘स्पीड’ला भिडणार : रोहित शर्मा
नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजांचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असल्याचे मत भारताचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे़ भारतीय खेळाडू आता आॅस्ट्रेलियातील उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांना घाबरत नाहीत, असेही या स्टार खेळाडूने म्हटले आहे़
भारत डिसेंबरमध्ये आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे़ या पार्श्वभूमीवर रोहित पुढे म्हणाला, आॅस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन, रियान हॅरिस, पीटर सिडल या अनुभवी गोलंदाजांचा सामना करणे आमच्यासमोर आव्हान असेल यात शंका नाही; मात्र दक्षिण आफ्रिकेत आम्ही डेल स्टेन, मोर्ने मोर्केलसारख्या गोलंदाजांचा सामना केला आहे़ त्यामुळे आम्ही आॅस्ट्रेलियन गोलंदाजांना यशस्वीपणे सामोरे जाऊ, असा विश्वासही रोहितने व्यक्त
केला आहे़
रोहितने सांगितले की, आम्ही यापूर्वीसुद्धा आॅस्ट्रेलियाचा दौरा केला आहे़ त्यामुळे तेथील खेळपट्ट्यांचा आम्हाला पूर्णपणे अंदाज आहे़ विशेष म्हणजे आगामी वन-डे विश्वचषक आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार असल्यामुळे डिसेंबरमध्ये होणारा दौरा आमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे़
हा स्टार खेळाडू पुढे म्हणाला, अजिंक्य रहाणे यानेसुद्धा इंग्लंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत सलामीला फलंदाजी करताना उत्कृष्ट खेळ केला होता; मात्र रहाणे आणि माझ्यात सलामीवीराची भूमिका निभावण्यासाठी कोणतीही स्पर्धा नाही, असेही रोहितने स्पष्ट केले़ (वृत्तसंस्था)