Roger Federer stunned by Grigor Dimitrov in US open quarterfinals | दमवलं अन् हरवलं; 'बेबी' फेडररचा 'बाबा' फेडररला धक्का!
दमवलं अन् हरवलं; 'बेबी' फेडररचा 'बाबा' फेडररला धक्का!

टेनिसमधील 'बापमाणूस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉजर फेडररचं अमेरिकन ओपनमधील आव्हान आज उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं. बेबी फेडरर, अर्थात ग्रिगोर दिमित्रोव्हनं पाच सेटच्या थरारक सामन्यात फेडररचा पराभव केला. फोरहँडसह अन्य काही फटके फेडररच्याच स्टाईलने खेळत असल्यानं दिमित्रोव्हला बेबी फेडररही म्हटलं जातं. या 'बेबी'नं आज 'बाबा'ला पार दमवल्याचं पाहायला मिळालं. 

तिसऱ्या मानांकित रॉजर फेडररनं पहिला सेट 6-3 असा जिंकला होता. स्वाभाविकच, त्याचं पारडं आणखी जड झालं होतं. पण, दुसऱ्या सेटमध्ये दिमित्रोव्हने बाजी मारली. त्यानं 6-4 ने सेट जिंकला. मात्र त्याचा आनंद फेडररने फार काळ टिकू दिला नाही. तिसरा सेट पुन्हा 6-3 असा खिशात टाकत त्याने आघाडी घेतली. आता फेडररचं मनोबल उंचावलं होतं. तो सेमी फायनलपासून फक्त एक सेट दूर होता. 

अशा वेळी आपलं सगळं कसब पणाला लावून दिमित्रोव्ह लढला आणि जिंकलासुद्धा. चौथा सेट 6-4 असा जिंकत त्याने बरोबरी साधली. या धक्क्यातून फेडरर स्वत:ला सावरू शकला नाही. पाचव्या सेटमध्ये तो पारच हतबल वाटला. हा सेट 6-2 असा जिंकून बेबी फेडररनं सेमी फायनलमध्ये धडक मारली. 

Image

60 अनफोर्स्ड एरर (टाळता येण्याजोग्या चुका) रॉजर फेडररला महागात पडलेच, पण शेवटच्या सेटमध्ये दुखापतीने डोकं वर काढल्यानंही तो झुंज देऊ शकला नाही. अव्वल नंबरी नोवाक जोकोविचनं चौथ्या फेरीच्या सामन्यात दुखापतीमुळे माघार घेतली होती.

Web Title: Roger Federer stunned by Grigor Dimitrov in US open quarterfinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.