रिओ आॅलिम्पिक गोल्ड हेच टार्गेट
By Admin | Updated: September 2, 2015 23:37 IST2015-09-02T23:37:48+5:302015-09-02T23:37:48+5:30
पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणे हेच आपले प्रमुख टार्गेट आहे; परंतु त्याआधी आपला पहिला फोकस हा आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्यावर असल्याचे

रिओ आॅलिम्पिक गोल्ड हेच टार्गेट
जयंत कुलकर्णी, औरंगाबाद
पुढील वर्षी होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणे हेच आपले प्रमुख टार्गेट आहे; परंतु त्याआधी आपला पहिला फोकस हा आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्यावर असल्याचे मत वर्ल्डचॅम्पियन मेरीकोमप्रमाणेच भारताचे नाव बॉक्सिंगमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणाऱ्या दिग्गज महिला बॉक्सर व अर्जुन पुरस्कारप्राप्त लैशराम सरितादेवी हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
रिओ आॅलिम्पिकच्या तयारीसाठी लैशराम सरितादेवी औरंगाबादेतील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात सरावासाठी आली आहे. भारताचे दिग्गज बॉक्सर आणि अर्जुन व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डिंको सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सरितादेवी औरंगाबादेत कसून सराव करीत आहे. ‘लोकमत’शी बोलताना तिने मनमोकळेपणाने संवाद साधला.
आॅलिम्पिक गोल्ड क्वीस्ट यांनी आपल्याला स्पॉन्सर केले. त्यांनीच माझ्या सरावासाठी औरंगाबादेतील ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्राची निवड केली. येथील साईचे पश्चिम विभागीय केंद्र अतिशय शांत आणि ट्रेनिंगसाठी योग्य आहे. येथे कोणताही अडथळा नाही. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कारविजेते डिंक ो सिंग यांच्यामुळे तर आपला आत्मविश्वास उंचावला आहे. रिओ आॅलिम्पिकमध्ये गोल्ड हेच आपले स्वप्न आहे; परंतु सध्या तरी माझा फोकस हा जानेवारी महिन्यात होणाऱ्या पात्रता स्पर्धेवर आहे. आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणे हे आधी महत्त्वाचे आहे, असे तिने सांगितले.
आपल्या कारकिर्दीतील चढ-उतारही तिने सांगितले. २००५ हे वर्ष आपल्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट असल्याचे लैशराम सरितादेवी म्हणते. आपल्या जुन्या आठवणीत रमताना लैशराम सरितादेवी म्हणाली, आमचे कुटुंब गरीब होते. अवघी १३ वर्षांची असताना वडिलांचे निधन झाले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आईलाही खूप स्ट्रगल करावे लागले. २००२ मध्ये बॉक्सिंगला सुरुवात केली असली तरी घरची प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळे २००५ मध्ये बॉक्सिंग सोडण्याचे विचार मनात घोळत होते; परंतु २००५ मध्ये अमेरिकेत झालेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत कास्यपदक मिळाले आणि मणीपूर येथे मला पोलिसांत नोकरी मिळाली. पैसे मिळू लागले आणि त्यामुळे कुटुंबासाठी मदतही होऊ लागली व उदरनिर्वाह व्यवस्थित होऊ लागला आणि प्रमोशनही मिळाले. आता मी डीएसपी आहे. माझ्या कारकिर्दीतील हा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा टर्निंग पॉर्इंट होता.
गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पंचांनी केलेला अन्याय मात्र ती अजूनही विसरलेली दिसली नाही. इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत सरिताने ६० किलो वजन गटात दक्षिण कोरियाच्या जिना पार्क हिच्याविरुद्ध जबरदस्त कामगिरी करताना तिच्यावर ठोशांचा वर्षाव करताना वर्चस्व राखले; परंतु प्रत्यक्षात पंचांनी पक्षपात करताना दक्षिण कोरियाच्या प्रतिस्पर्ध्याला विजयी घोषित केले होते. याविषयी भारतातर्फेदेखील आक्षेप दाखल करण्यात आला होता. याविषयी खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांचेही तिला समर्थन मिळाले होते. याविषयीची खंत सरिताच्या मनात अजूनही आहे. त्यामुळेच आॅलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक जिंकून देण्याचा वज्रनिर्धार तिच्या बोलण्यातून दिसून येतो.
आधीच्या दुखापतीतून आपण पूर्णपणे सावरलो असून आत्मविश्वासाने आपले ट्रेनिंग सुरू आहे,असे सांगताना तिने हार-जीत होतच असते. आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या वाटेला ‘गम’ आले; परंतु आॅलिम्पिकमध्ये देशाला पदक जिंकून खुशीही मिळवून देऊ, असा दुर्दम्य विश्वास तिने व्यक्त केला. मेरी कोम आणि आपल्यामुळे मुलींमध्येही बॉक्सिंग खेळाचा रस वाढू लागला आहे. मुलींनीही फक्त आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठीच नव्हे, तर स्वसंरक्षणासाठीदेखील हा खेळ शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे फिजिकल फिटनेस तर होतोच, शिवाय मनातील भीतीही निघून जाते, असे सांगतानाच अभ्यास असो अथवा खेळ यात मनापासून योगदान द्यायला हवे आणि त्यात शिस्तीवर जास्त फोकस करायला हवा, असा संदेशही उदयोन्मुख खेळाडूंना तिने दिला.