आॅलिम्पियन सायकलपटू चालवितो रिक्षा!

By Admin | Updated: August 4, 2016 04:00 IST2016-08-04T04:00:22+5:302016-08-04T04:00:22+5:30

काही दशकांपूर्वी सायकलिंगमध्ये वर्चस्व गाजवीत अनेक चकाकते चषक त्याने उंचावले.

Rickshaw runs the Olympian cycle! | आॅलिम्पियन सायकलपटू चालवितो रिक्षा!

आॅलिम्पियन सायकलपटू चालवितो रिक्षा!


लाहोर : काही दशकांपूर्वी सायकलिंगमध्ये वर्चस्व गाजवीत अनेक चकाकते चषक त्याने उंचावले. पाकिस्तानात त्याच्या नावाचा जयजयकार व्हायचा. वृद्धापकाळात मात्र त्याच्या वाट्याला उपेक्षिताचे जगणे आले आहे. ८१ वर्षांच्या या आॅलिम्पिकपटूने स्वत:ची व्यथा ऐकविली तेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.
दोन वेळेच्या उपजीविकेसाठी आज हा माजी खेळाडू लाहोरच्या गल्लीबोळात रिक्षा ओढतो आहे. मोहम्मद आशिक त्याचे नाव! तो म्हणतो, ‘‘मी त्या वेळी पाकिस्तानचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अनेक मुख्य कार्यकारी यांचेशी हस्तांदोलन केले. सर्व जण मला विसरले. असे का घडावे, याचा विचार मनात येतो तेव्हा स्वत:वरील विश्वास उडाल्याची जाणीव होते.’’
१९६० आणि १९६४ च्या आॅलिम्पिकमध्ये सायकलपटू म्हणून सहभागी झालेला आशिक आता रिक्षा ओढत आहे. सायकलिंगमधील करिअर संपल्यानंतर नशिबानेदेखील आशिकला दगा दिला. त्याने जनसंपर्क अधिकारी म्हणून नोकरी केली, पण १९७७ साली तब्येत खराब होताच ती नोकरी गमवावी लागली. त्यानंतर टॅक्सी आणि व्हॅन चालविली. पण, कौटुंबिक स्थिती इतकी खालावली की रिक्षा चालवून संसाराचा गाडा ओढणे भाग पडले.
कुटुंबासोबत साडेचारशे चौरस फूट घरात राहणाऱ्या आशिकची कमाई दरदिवशी चारशे रुपये आहे. पत्नीचे निधन झाले. चारही मुले त्याच्यापासून वेगळी राहतात. आशिक आधी आपली सर्व पदके रिक्षावर लावत असे. आता सर्व पदके घरीच पेटीत ठेवली.
आशिकने अमेरिकेचे माजी राष्ट्रपती केल्विन कुलिज यांचे प्रसिद्ध वाक्य पाठ केले आहे. तो म्हणतो, ‘आपल्या नायकांना विसरणारा देश कधीही प्रगती करू शकत नाही.’ त्याच्या वेदना इतक्या तीव्र होतात की आशिक बोलून जातो,‘ गरिबांनी कधीही खेळात भाग घेऊ नये.’! तो पुढे म्हणाला,‘एकदा माझी पत्नी रडायला लागली तेव्हा मी तिला कारण विचारले. ती माझ्या तब्येतीबद्दल चिंतेत होती. मी तिला म्हटले, आनंदी राहा, जे आपल्याला विसरले त्यांना विसरण्याचा प्रयत्न कर. माझ्या सांगण्यानंतर ती आनंदी राहायची. नंतर थोड्याच दिवसांनी ती मला सोडून गेली. मीदेखील रोज मरण येण्यासाठी अल्लाकडे प्रार्थना करतो. (वृत्तसंस्था)

Web Title: Rickshaw runs the Olympian cycle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.