अहमदाबाद : लागोपाठ चार सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला राजस्थान रॉयल्स आणि बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात आयपीएल-८ मध्ये रविवारी वर्चस्वाची लढाई अनुभवायला मिळणार आहे. जखमी कर्णधार शेन वाटसनच्या अनुपस्थितीत स्टीव्हन स्मिथने राजस्थानचे चाणाक्ष नेतृत्व करीत चारही सामने जिंकून दिले. दोनवेळचा चेन्नईदेखील मागे नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात संघाने तीन सामने जिंकले. राजस्थानचे हे स्थानिक मैदान असून, या संघातील फलंदाज आणि गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी बजावली. हैदराबादविरुद्ध अजिंक्य रहाणेने ६२ धावा केल्या तर स्मिथने मुंबईविरुद्ध नाबाद ७९ धावा ठोकल्या. गोलंदाजीत टीम साऊदी, द.आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस, आॅस्ट्रेलियाचा जेम्स फॉल्कनर व भारताचा धवल कुलकर्णी आहेतच. हरियाणाचा दीपक हुड्डा यानेही दिल्लीविरुद्ध फलंदाजीत ठसा उमटविला होता. १९ वर्षांचा हुड्डा यंदाच्या आयपीएलचा शोध मानला जातो.दुसरीकडे चेन्नईने पहिल्याच सामन्यात दिल्लीला एका धावेने धक्का दिला. सनरायजर्सविरुद्ध मॅक्युलमने शतक झळकविले. तसेच ड्वेन स्मिथ, सुरेश रैना आणि धोनी यांनीही धावा काढल्या. गोलंदाजीत अनुभवी आशिष नेहरा, ईश्वर पांडे, मोहित शर्मा आणि ड्वेन ब्राव्हो प्रभावी ठरले. उभय संघात आतापर्यंत झालेल्या १३ सामन्यांत चेन्नईने ८ तर रॉयल्सने ५ सामने जिंकले. या सत्रात उभय संघ पहिल्यांदा परस्परांविरुद्ध खेळतील. (वृत्तसंस्था)
राजस्थान रॉयल्स -सुपरकिंग्स यांच्यात वर्चस्वाची लढत
By admin | Updated: April 19, 2015 01:11 IST