पराभवानंतर स्मिथची अजिंक्य रहाणेला 'बिअर' ऑफर
By Admin | Updated: March 29, 2017 11:34 IST2017-03-29T11:23:01+5:302017-03-29T11:34:12+5:30
चार सामन्यांच्या हाय व्होल्टेज मालिकेच्या समाप्तीनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघासमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे

पराभवानंतर स्मिथची अजिंक्य रहाणेला 'बिअर' ऑफर
>ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 29 - चार सामन्यांच्या हाय व्होल्टेज मालिकेच्या समाप्तीनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघासमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. मंगळवारी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा मालिकेत 2-1 ने पराभव करत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडे राखली. यानंतर स्टीव्ह स्मिथ आयपीलमधील सहकारी अजिंक्य रहाणे आणि भारतीय क्रिकेट संघाच्या भेटीसाठी पोहोचला. यावेळी त्यांनी रहाणे आणि संघाला बिअरची ऑफरदेखील केली. विशेष म्हणजे या संपुर्ण मालिकेदरम्यान मैदान आणि मैदानाबाहेर दोन्ही ठिकाणी संघांमध्ये प्रचंड तणाव होता.
मात्र मालिका संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथने आपल्या भावनांना आवर न घालू शकल्याने माफी मागितली. तसंच सामना संपल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेसोबत संक्षिप्त चर्चादेखील केली. आयपीएल संघ रायजिंग पुणे सुपरजायंट्सचा कर्णधार असलेल्या स्टीव्ह स्मिथने सांगितलं आहे की, 'मी पुढच्याच आठवड्यात रहाणेला भेटणार आहे. तो माझ्या संघात खेळत आहे. प्रत्येक मालिकेनंतर आपण ड्रिंक करण्यासाठी एकत्र भेटायचं का असं मी त्याला विचारलं. यावर अजिंक्य रहाणेने मी तुझ्याशी नंतर बोलतो असं उत्तर दिलं. अजिंक्य आणि माझे चांगले संबंध आहेत. तो माझ्या संघात असून पुढच्या आठवड्यात आम्ही एकत्र असू'.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने यावेळी भारतीय संघाने दाखवलेल्या संयमासोबत दाखवलेल्या आक्रमक खेळीचं कौतुक केलं आहे. यामुळे आपल्या एकाच कसोटी सामन्यातील वेगवेगळ्या परिस्थितींचा अभ्यास करण्यास मदत मिळाल्याचं स्मिथ बोलला आहे. 'त्यांनी काही वेळा आक्रमक खेळी दाखवली, तर काही वेळा अत्यंत संयमक खेळी करत बचाव केला. मला त्यांच्याकडू हे सर्व शिकायला मिळालं. भारतात अनेकवेळा परिस्थितीप्रमाणे आपला खेळ बदलावा लागतो', असं स्मिथने सांगितलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दुस-या डावात मुरली विजयने आपण घेतलेला झेल योग्य असल्याचा दावा केल्यानंतर स्मिथने यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर त्याच्यावर जोरदार टीकाही झाली होती. यावर बोलताना स्मिथने सांगितलं की, 'काही वेळा माझं माझ्या भावनांवर नियंत्रण नसतं. यासाठी मी माफी मागतो'.
यावेळी स्टीव्ह स्मिथने मालिकेतील आपल्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं. तीन शतकांच्या मदतीने स्टीव्ह स्मिथने एकूण 499 धावा केल्या. 'माझ्या कामगिरीवर मला गर्व आहे. मी स्वत:साठी काही आव्हान ठेवली आहेत. त्यांच्या पुढे जाऊन नेतृत्व करण्याची माझी इच्छा होती', असं स्मिथ बोलला आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाचा चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून पराभव केला आणि वाद व तणाव यामुळे चर्चेत राहिलेल्या मालिकेत २-१ ने बाजी मारत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आपल्याकडे राखली.भारताने सलग सातव्या कसोटी मालिकेत विजय मिळवला. भारताने २०१५ पासून आतापर्यंत श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेश या संघाचा पराभव केला आहे.