यंदाच्या वर्षी मातब्बर खेळाडूंना धक्का
By Admin | Updated: July 14, 2017 01:07 IST2017-07-14T01:07:54+5:302017-07-14T01:07:54+5:30
विम्बल्डन स्पर्धेची वाटचाल आता शेवटच्या दोन फेऱ्यांकडे चालू आहे.

यंदाच्या वर्षी मातब्बर खेळाडूंना धक्का
केदार ओक लिहितात...
विम्बल्डन स्पर्धेची वाटचाल आता शेवटच्या दोन फेऱ्यांकडे चालू आहे. पुरुषांच्या स्पर्धेचा जेव्हा विचार येतो तेव्हा चार नावांना डावलून पुढे जाताच येत नाही. रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोवाक जोकोविच आणि अँडी मरे या चौघांभोवतीच चर्चेचं वलय असतं. विम्बल्डनच्या बाबतीत तर हे चौघे आणि बाकीचे यांच्यातली दरी अजूनच मोठी होते. फेडररने २००३ साली विम्बल्डन जिंकल्यानंतर गेल्या १४ वर्षांत फक्त याच चौघांपैकी एकाचं नाव करंडकावर कोरलं जातंय. रॉजर ७, जोकोविच ३ आणि नदाल, मरे प्रत्येकी २ वेळा. यंदाच्या वर्षी मात्र बाजी उलटली आणि ह्या चौघांमधल्या ३ जणांचा उपांत्य फेरीपूर्वीच गाशा गुंडाळला गेला आहे. कोण आहेत हे बिग थ्री?
राफा नदाल
चौथ्या फेरीच्या सामन्यात अनुभवी म्युलरने नदालला मात दिली. गेल्या पाच वर्षांतली नदालची विम्बल्डनमधली कामगिरी जरी यथातथाच असली तरी यंदा मात्र राफा इतक्या लवकर स्पधेर्बाहेर जाईल असं वाटलं नव्हतं. कारण तो गेल्या सहा महिन्यांपासून अत्युच्च खेळ करतोय. नुकतंच विश्वविक्रमी दहावं फ्रेंच ओपनही जिंकून आला होता. शिवाय हिरवळीवरही त्याने खूप लवकर जुळवून घेतलं होतं. राफा अत्यंत चिवट खेळ करतो. प्रत्येक पॉइंट हा सामन्यातला शेवटचा पॉइंट असल्यासारखा खेळत असल्यामुळे प्रतिस्पर्ध्याला सातत्याने उत्तम खेळ करावा लागतो. त्यादिवशी म्युलरने जोरदार सर्व्हिस, शारीरिक आणि मानसिक कणखरतेच्या जोरावर झकास विजय मिळवला. क्ले किंग" ने त्याच्या कारकिर्दीत हिरवळ दणाणून सोडली नसली तरी एकेकाळी त्याच्या अत्युच्च फॉर्ममध्ये असताना (२००९ मध्ये दुखापतीमुळे झालेली अनुपस्थिती वगळता) सलग पाच वेळा अंतिम फेरी गाठली आणि दोन वेळा विजेतेपदही पटकावलेलं आहे. राफाचे चाहते निराश झाले असतील; पण राफा तंदुरुस्त होऊन पुन्हा एकदा उत्कृष्ट दर्जाचं टेनिस खेळायला लागला आहे, जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा पहिल्या चारमध्ये परत आलेला आहे, हेही नसे थोडके. पुढली किमान दोन वर्षं टेनिस चाहत्यांना पर्वणी आहे हे नक्की.
नोवाक जोकोविच
गेल्या वर्षीपर्यंत एकही सामना हरेल असं वाटत नसणारा जोकोविच आता कुणाहीकडून हरेल असं वाटतं. तो आता अजिंक्य राहिलेला नाही. आधी घरगुती वैयक्तिक कारणं आणि मग दुखापतींमुळे गेल्या वर्षभरात त्याचा खेळ चांगलाच खालावला. वाईट फॉर्मला कंटाळून जोकोविचने काही महिन्यांपूर्वी त्याच्या संपूर्ण "कोचिंग स्टाफ" ला सोडचिठ्ठी दिली. आंद्रे आगासीला "सुपरकोच" म्हणजे अधूनमधून मार्गदर्शन करण्यासाठी त्याने गळ घातली. जोकोविचचा खेळ पुन्हा एकदा सुधारल्यासारखा वाटत होता पण परवाच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याच्या उजव्या हाताच्या कोपराच्या दुखण्याने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आणि त्याला सामना अर्धवट सोडावा लागला. हा चॅम्पियन खेळाडू लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होऊन पुन्हा एकदा वर्चस्व गाजवेल अशी आशा करू या.
अँडी मरे
दुसऱ्या एका उपांत्यपूर्व फेरीत यजमान देशाचा गेल्या वर्षीच्या विम्बल्डन विजेता, नंबर वन असलेल्या अँडी मरेची वाटचालही थांबली. गेल्या वर्षी स्पर्धा जिंकून त्याने जोकोविचकडून "नंबर वन" पद हस्तगत केलं होतं. पण या वर्षी जोकोविचप्रमाणे अँडीचाही फॉर्म दुखापतींमुळे हरवला आहे. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांमधल्या अंतिम फेरीत होणाऱ्या सततच्या पराभवामुळे त्याला पूर्वी बऱ्याचदा रडू यायचं. १२ साली यूएस आणि १३ साली विम्बल्डन जिंकल्यावर वाटलं होतं की सुरवंटाचं फुलपाखरू झालं; पण पुन्हा पुढली तीन वर्षं भाकडच गेली. गेल्या विम्बल्डनच्या आधी हा माणूस १० ग्रँडस्लॅम फायनल खेळला होता. त्यात तब्बल ८ वेळा ह्याला मान खाली घालावी लागली. मग २०१६ ला विम्बल्डन जिंकला आणि पुन्हा एकदा त्याने अश्रूंना वाट करून दिली. रडेल नाहीतर काय करेल बिचारा? हे खेळाडू सतत खेळत असतात. क्वचित जिंकतात, बऱ्याचदा हरतात. त्यांना व्यक्त व्हायला मिळतच नाही. कितीतरी मनात साठलेलं असतं. मग कधीतरी ते असं बाहेर येतं. ही अशी धरणाची दारं उघडावी अधूनमधून. साठलेल्याचा निचरा होतो. सगळं कसं परत स्वच्छ आणि नितळ. पुन्हा नव्या दमाने लढण्यासाठी.