मुंबई संघाने काढले पंजाबचे दिवाळे!
By Admin | Updated: October 10, 2015 01:07 IST2015-10-10T01:07:32+5:302015-10-10T01:07:32+5:30
धमाकेदार फलंदाज श्रेयस अय्यर आणि कर्णधार आदित्य तरेने पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत मुंबईने ६ गड्यांच्या मोबदल्यात ४९५ धावांचा डोंगर रचला. श्रेयसने रचलेल्या

मुंबई संघाने काढले पंजाबचे दिवाळे!
मुंबई : धमाकेदार फलंदाज श्रेयस अय्यर आणि कर्णधार आदित्य तरेने पंजाबच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत मुंबईने ६ गड्यांच्या मोबदल्यात ४९५ धावांचा डोंगर रचला. श्रेयसने रचलेल्या द्विशतकी खेळीच्या जोरावर आदित्यने शतकरूपी कळस चढवत मुंबईला ३४१ धावांची मजबूत आघाडी मिळवून दिली.
पहिल्या दिवशीची आक्रमकता श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या जोडीने दुसऱ्या दिवशीही कायम ठेवत सामन्याला सुरुवात केली. कालच्या २ बाद १०३ धावांवरून पुढे खेळताना या जोडीने पंजाबच्या गोलंदाजांना सळो की पळो केले. पंजाबचा कर्णधार युवराज सिंगने ही जोडी फोडण्याचे खूप प्रयत्न केले खरे, पण श्रेयस-सूर्यकुमारसमोर पंजाबच्या गोलंदाजांची डाळ शिजली नाही. आंध्रविरुद्धच्या सामन्यात श्रेयस मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला, या सामन्यात मात्र त्याने कोणतीही कसर ठेवली नाही. श्रेयसने १७६ चेंडूंत २५ चौकारांच्या साथीने २०० धावा केल्या, त्यात ५ गगनचुंबी षटकारांचाही समावेश होता. विशेष म्हणजे त्याने ११३.६३ च्या धावगतीने या धावा काढल्या.
एका बाजूने श्रेयस चौफेर फटकेबाजी करत असताना दुसऱ्या बाजूने सूर्यकुमार यादवने त्याला सुरेख साथ देत आपले अर्धशतक पूर्ण केले. श्रेयस ऐन रंगात असल्याने सूर्यकुमारने जास्तीत जास्त त्याला खेळण्याची संधी दिली. सुर्यकुमारने १६२ चेंडूंत १० चौकार आणि १ षटकार लगावत ७८ धावांची लयलूट केली. अखेर ५९ व्या षटकात सरबजीत लढ्ढाने ही जोडी फोडली. त्याने सूर्यकुमारला गीतांश खेराच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर श्रेयसच्या साथीने कर्णधाराने फलंदाजीचा आनंद लुटला. आॅक्टोबर हीट आणि मुंबईकरांची तळपती बॅट पाहून पंजाबचे गोलंदाज पुरते घामाघूम झाले. युवराजला जोरदार फटका लगावण्याच्या प्रयत्नात असणारा श्रेयस ६९ व्या षटकात बाद झाला. तत्पूर्वी श्रेयसने आपली जबाबदारी चोख पार पाडली होती.
आदित्य तरेने सिद्धार्थ लाडच्या साथीने खेळाला सुरुवात केली. ४ बाद ३३८ या भक्कम स्थितीचा फायदा उचलत आदित्यने शतक साजरे केले. सिद्धार्थ बी. सरनच्या अफलातून चेंडूवर बाद झाला. दरम्यान, कर्णधाराच्या साथीने त्याने ७४ धावांची भागीदारी केली. संघाच्या धावसंख्येत १२ धावांची भर घालून अभिषेक नायर (५) ही बाद झाला. दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा मुंबईने ६ बाद ४९५ धावा केल्या. आदित्य नाबाद १११ तर धवल कुलकर्णी नाबाद ३० धावांवर खेळत आहे. पंजाबचा बी. सरन वगळता एकाही गोलंदाजाला मुंबईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवता आला नाही. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबई (पहिला डाव) : श्रेयस अय्यर झे. कौल गो. युवराज सिंग २००, सूर्यकुमार यादव झे. खेरा गो. लढ्ढा ७८, सिद्धार्थ लाड झे. खेरा गो. बी.सरन २८, अभिषेक नायर झे. वोहरा गो. बी. सरन ५, आदित्य तरे खेळत आहे १११, धवल कुलकर्णी खेळत आहे ३०. एकूण - ११२ षटकांत ६ बाद ४९५ धावा.
गोलंदाजी : सिद्धार्थ कौल २२-२-८८-१, बी. सरन २२-३-८७-३, वरुण खन्ना २८-४-१२२-०, सरबजीत लढ्ढा २९-१-१५४-१, युवराज सिंग ४-०-१२-१, हिमांशू चावला २-०-६-०, मनदीप सिंग ५-१-१९-०.