पंजाबला विजय आवश्यक
By Admin | Updated: May 11, 2017 00:59 IST2017-05-11T00:59:19+5:302017-05-11T00:59:19+5:30
प्ले आॅफमधील जागा याआधीच निश्चित केल्यानंतर, मुंबई इंडियन्स गुणतालिकेत अग्रस्थान निश्चित करण्याच्या उद्देशाने गुरुवारी

पंजाबला विजय आवश्यक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्ले आॅफमधील जागा याआधीच निश्चित केल्यानंतर, मुंबई इंडियन्स गुणतालिकेत अग्रस्थान निश्चित करण्याच्या उद्देशाने गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध घरच्या मैदानावर लढेल. त्याचवेळी, प्ले आॅफसाठी आव्हान कायम ठेवण्याकरिता पंजाबला मुंबईविरुद्ध विजय अनिवार्य असेल. मुंबईचे १२ सामन्यांतून १८ गुण असून, पंजाबचे १२ सामन्यांत १२ गुण आहेत.
पंजाबचा मुंबईविरुद्ध पराभव झाल्यास त्यांचे आव्हान संपुष्टात येईल. अशा परिस्थितीमध्ये मुंबईसह, कोलकाता, पुणे आणि हैदराबाद यांचे प्ले आॅफमधील स्थान निश्चित होईल. विशेष म्हणजे, हे तिन्ही संघ आपला अखेरचा साखळी सामना खेळण्याआधीच बाद फेरीत प्रवेश करतील. त्याचवेळी पंजाबचे दोन सामने शिल्लक असून, हैदराबादचा केवळ एक सामना शिल्लक आहे. हैदराबाद १५ गुणांसह चौथ्या स्थानी आहेत. त्यामुळे, पंजाबला आपले दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. पंजाबचा अखेरचा सामना पुण्याविरुद्ध होईल.
दुसरीकडे हैदराबादकडून झालेल्या पराभवानंतर मुंबईकर विजयी मार्गावर येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे पंजाबसमोरील आव्हान सोपे नसेल. यंदाच्या मोसमात मुंबईची फलंदाजी चांगलीच बहरली आहे. कर्णधार रोहित शर्मा, नितीश राणा, पार्थिव पटेल, केरॉन पोलार्ड आणि लेंडल सिमेन्स यांंनी आपली छाप पाडली आहे. तसेच, हार्दिक आणि कृणाल या पांड्या बंधूने अष्टपैलू खेळाची चमक दाखवत संघाला बळकटी आणली आहे. गोलंदाजीमध्ये हरभजन सिंगच्या पुनरागमनाने संघाला मदत होत आहे. न्यूझीलंडच्या मिशेल मॅक्क्लेनघनने यंदाच्या मोसमात मुंबईकडून सर्वाधिक १७ बळी घेतले असून, स्टार लसिथ मलिंगाने त्याला चांगली साथ दिली आहे. शिवाय, डेथ ओव्हर्समध्ये निर्णायक मारा करणारा जसप्रीत बुमराह मुंबईचा महत्त्वाचा गोलंदाज ठरत आहे.