श्रीकांतला आता चुकांवर नियंत्रण ठेवावे लागेल: गोपीचंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 10:05 AM2021-12-22T10:05:46+5:302021-12-22T10:06:49+5:30

किदाम्बी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला.

pullela gopichand said srikanth now has to control his mistakes | श्रीकांतला आता चुकांवर नियंत्रण ठेवावे लागेल: गोपीचंद 

श्रीकांतला आता चुकांवर नियंत्रण ठेवावे लागेल: गोपीचंद 

Next

नवी दिल्ली : किदाम्बी श्रीकांतने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. आता पुढील वर्षात अत्यंत व्यस्त वेळापत्रक असून, यामध्ये सातत्याने चांगली कामगिरी करण्यासाठी श्रीकांतला चुका करण्यावर नियंत्रण राखावे लागेल, अशी प्रतिक्रिया भारताचे मुख्य बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी दिली. श्रीकांतला रविवारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत रौप्यपदक जिंकणारा श्रीकांत भारताचा पहिला पुरुष शटलर ठरला होता.

गोपीचंद यांनी सांगितले की, ‘प्रत्येक सामन्यागणिक श्रीकांतच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्यात आत्मविश्वासाची कमतरता होती, परंतु ली जी जिया आणि केंटो मोमोटा यासारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध केलेल्या शानदार खेळाने त्याचा आत्मविश्वास उंचावला. 

विशेष म्हणजे त्याला योग्य वेळेला लय मिळाली. आता पुढील वर्षी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा यासारख्या मोठ्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी त्याला आपल्या चुकांवर नियंत्रण राखावे लागेल.’

गोपीचंद पुढे म्हणाले की, ‘सलग स्पर्धा खेळल्याने अनेक खेळाडूंसाठी दुखापतीतून सावरणे कठीण होते. श्रीकांतसोबतही असेच झाले. ऑलिम्पिक पात्रतेसाठी त्याने पुनरागमनासाठी घाई केली. स्पेनमध्ये त्याला तीन गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात खेळताना पाहून चांगले वाटले. सुदीरमन कप स्पर्धेपासून तो सातत्याने खेळत असून हे चांगले संकेत आहेत.’ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत श्रीकांतसह एच. एस. प्रणॉय आणि लक्ष्य सेन यांनीही छाप पाडली. प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत, तर लक्ष्य उपांत्य फेरीत पराभूत झाला. श्रीकांतने लक्ष्यलाच नमवीत अंतिम फेरीत धडक दिली होती. याबाबत गोपीचंद म्हणाले की, ‘या खेळाडूंना अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये पोहोचल्याचे पाहून आनंद झाला. लक्ष्य आणि प्रणॉय यांनीही शानदार खेळ केला. आगामी महत्त्वाच्या सत्रासाठी ही चांगली चिन्हे आहेत.’
 

Web Title: pullela gopichand said srikanth now has to control his mistakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.