प्रो कबड्डी लीग : दिल्लीच्या दबंगगिरीला रोखत बंगाल वॉरियर्सने पटकावले जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 21:56 IST2019-10-19T21:55:30+5:302019-10-19T21:56:29+5:30

स्पर्धेतील कामगिरी पाहता दिल्लीकडे संभाव्य विजेते पाहिले जात होते, मात्र बेंगालने शानदार खेळ करत ३९-३४ अशा गुणांनी बाजी मारली.

Pro Kabaddi League: Bengal win first title of pro kabaddi | प्रो कबड्डी लीग : दिल्लीच्या दबंगगिरीला रोखत बंगाल वॉरियर्सने पटकावले जेतेपद

प्रो कबड्डी लीग : दिल्लीच्या दबंगगिरीला रोखत बंगाल वॉरियर्सने पटकावले जेतेपद

अहमदाबाद : जबरदस्त अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात बेंगाल वॉरियर्स संघाने झुंजार खेळाचे प्रदर्शन केले आणि पिछाडीवरुन बाजी मारत बलाढ्य दबंग दिल्लीला मात देत पहिल्यांदाच प्रो कबड्डी लीगचे जेतेपद पटकावले. स्पर्धेतील कामगिरी पाहता दिल्लीकडे संभाव्य विजेते पाहिले जात होते, मात्र बेंगालने शानदार खेळ करत ३९-३४ अशा गुणांनी बाजी मारली.


एका अरेना स्टेडियममध्ये झालेल्या या अंतिम सामन्यात सर्वांच्या नजरा दबंग दिल्ली संघाकडे लागल्या होत्या. यंदाच्या लीगमध्ये त्यांनी २२ पैकी १५ सामने जिंकून गुणतालिकेत निर्वावाद वर्चस्व लागले होते. दिल्लीकरांची यंदाची ‘दबंगगिरी’ पाहता जेतेपद त्यांचेच अशीच चर्चा रंगली होती. शिवाय अंतिम सामन्यातही दिल्लीकरांनी तुफानी सुरुवात करताना सहाव्याच मिनिटाला बेंगालवर लोण चढवून ११-४ अशी भक्कम आघाडी घेतली.


मात्र बेंगाल संघाच्या वॉरियर्सनी सहजासहजी हार न पत्करता कोणतेही दडपण न घेता सामन्याचे चित्र पालटले. बेंगालने यानंतर तब्बल तीन वेळा दिल्लीकरांवर लोण चढवून त्यांची हवा काढली. मोहम्मद नबिबक्ष आणि सुकेश हेगडे या आक्रमकांनी अनुक्रमे १० व ८ गुणांची कमाई करत दिल्लीच्या बचावाला खिंडार पाडले. दोघांनी बचावामध्येही एक गुण मिळवला. त्याचबरोबर बेंगालच्या बचावफळीने सांघिक खेळ करत दिल्लीला रोखण्यात मोलाचे योगदान दिले.


मध्यंतराला सामना १७-१७ असा बरोबरीत होता. मात्र त्याआधी सामन्यावर पकड मिळवलेली ती दिल्लीकरांनी एकट्या नविन कुमारने १८ गुणांची लयलूट करताना बेंगालवर चांगलेच दडपण आणले होते. मात्र त्याला इतर खेळाडूंकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. दिल्लीकरांकडून निर्णायक लढतीत सांघिक खेळ झाला नाही आणि याचाच मोठा फटका त्यांना बसला.

Web Title: Pro Kabaddi League: Bengal win first title of pro kabaddi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.