अध्यक्षीय चषक कॅरम : ओजस, काजल व विकास विजेते
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 14:56 IST2019-03-23T14:56:24+5:302019-03-23T14:56:46+5:30
अध्यक्षीय चषक कॅरम स्पर्धंच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत मुंबई महानगरपालिकेच्या विकास धारियाने बाजी मारली

अध्यक्षीय चषक कॅरम : ओजस, काजल व विकास विजेते
मुंबई : मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट माटुंगा आयोजित ८ व्या अध्यक्षीय चषक कॅरम स्पर्धंच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत मुंबई महानगरपालिकेच्या विकास धारियाने वरळी स्पोर्ट्स क्लबच्या फहीम काझीला २५-०, १९-१३ असे सहज दोन सेटमध्ये हरवून या गटाचे विजेतेपद मिळावीले. तर महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात फार्मात असलेल्या इंडियन ऑईलचा काजल कुमारीने जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला २५-६, १८-१५ असे सहज मात करत या गटात विजय प्राप्त केला. कुमार एकेरी १८ वर्षाखालील अंतिम सामन्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नायगावच्या ओजस जाधवने विजय कॅरम क्लब कडून खेळणाऱ्या मिहीर शेखला अटीतटीच्या लढतीत १३-६, ७-१२ व २२-७ असे हरविले.
पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी विकासने शिवतारा कॅरम क्लबच्या राहुल सोलंकीला १९-१७, २५-० असे तर फहीम काझीने एस एस ग्रुपच्या अभिषेक भारतीला १८-१४,२३-८ असे पराभूत केले होते. तर महिलांमध्ये अंतिम मजल मारताना काजलने जैन इरिगेशनच्या मिताली पिंपळेला २५-३,२५-८ व नीलमने बँक ऑफ इंडियाच्या जान्हवी मोरेला २५-१२,२५-० असे नमविले होते.
विजेत्यांना मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप मयेकर, सरचिटणीस यतीन ठाकूर, सेंट्रल रेल्वे इंस्टीट्युटचे सचिव रवी वर्तक व स्पोर्ट्स सचिव राजन सोहनी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.