प्रणव-सिक्की जोडीची दुसऱ्या फेरीत कूच
By Admin | Updated: April 14, 2016 02:53 IST2016-04-14T02:53:45+5:302016-04-14T02:53:45+5:30
प्रणव जैरी चोप्रा व एन. सिक्की रेड्डी या भारताच्या मिश्र दुहेरी जोडीने सिंगापूर सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत आपला चमकदार खेळ कायम राखताना दुसरी फेरी गाठली. त्याच वेळी पुरुषांच्या

प्रणव-सिक्की जोडीची दुसऱ्या फेरीत कूच
सिंगापूर : प्रणव जैरी चोप्रा व एन. सिक्की रेड्डी या भारताच्या मिश्र दुहेरी जोडीने सिंगापूर सुपर सिरिज बॅडमिंटन स्पर्धेत आपला चमकदार खेळ कायम राखताना दुसरी फेरी गाठली. त्याच वेळी पुरुषांच्या एकेरी गटात मात्र भारताचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
मागच्याच आठवड्यात वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेतेपद पटकवलेल्या प्रणव-सिक्की जोडीने इंडोनेशियाच्या इरफान फदहिलाह-वेनी अंग्रेनी या जोडीविरुद्ध २१-१५, २१-१७ असा विजय मिळवत दुसरी फेरी गाठली. पुढील फेरीत या भारतीय जोडीसमोर चीनच्या चौथ्या मानांकित शू चेन-मा जिन यांचे कडवे आव्हान असेल.
पुरुष एकेरी गटात मात्र पहिलीच फेरी भारतासाठी निराशाजनक ठरली. ज्यांच्यावर पदकांची आशा होती, ते किदांबी श्रीकांत, एचएस प्रणय व अजय जयराम यांना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले. विशेष म्हणजे आता तिघांचाही रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मार्गही अधिक खडतर झाला आहे.
जागतिक क्रमवारीत २२ व्या स्थानी असलेल्या प्रणयला झुंजार खेळानंतरही जगातील अव्वल खेळाडू आणि दोन वेळचा आॅल इंग्लंड चॅम्पियन चीनच्या चोंग लीविरुद्ध २१-१८, १८-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. एक तास ११ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात प्रणयने काही अप्रतिम फटके मारताना चोंग लीला झुंजवले. मात्र अखेरीस त्याचा प्रतिकार अपयशी ठरला. दुसऱ्या बाजूला श्रीकांतलाही तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात सू जेन हाओ विरुद्ध पराभूत व्हावे लागले. पहिला सेट जिंकून आघाडी घेतल्यानंतर श्रीकांत दुसऱ्या सेटमध्येही ९-७ असा आघाडीवर होता. मात्र, यानंतर हाओने जबरदस्त पुनरागमन करताना आक्रमक पवित्र घेत श्रीकांतला एकही संधी न देता ११-२१, २१-१८, २१-१८ अशी बाजी मारली. विशेष म्हणजे याआधी झालेल्या इंडिया ओपन आणि मलेशिया ओपन स्पर्धेतही
श्रीकांत पहिल्याच फेरीतून बाद झाला होता. (वृत्तसंस्था)
ज्वाला-पोनप्पाही फ्लॉप..
महिला दुहेरीतील भारताची स्टार जोडी ज्वाला गुट्टा-पोनप्पा यांची निराशाजनक कामगिरी या स्पर्धेतही कायम राहिली. कोरियाच्या गोह आह रा - यू हेइ वोन यांच्याविरुद्ध खेळताना ज्वाला-पोनप्पा १८-२१, १६-२१ असे पराभूत झाले.
अन्य एका लढतीत भारताच्या अजय जयरामलाही पहिल्याच फेरीतून आपला गाशा गुंडाळावा लागला. जर्मनीच्या अनुभवी मार्क ज्वेबलरविरुद्ध खेळताना अजयचा दोन सेटमध्येच १७-२१, १६-२१ असा पराभव झाला. दखल घेण्याची बाब म्हणजे, ज्वेबलरविरुद्ध आतापर्यंत खेळलेल्या ६ लढतींपैकी अजयचा हा ५ वा पराभव आहे.