पॉली उम्रीगर पुरस्कार विराट कोहलीला जाहीर
By Admin | Updated: March 2, 2017 00:14 IST2017-03-02T00:14:55+5:302017-03-02T00:14:55+5:30
भारताचा कर्णधार विराट कोहली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड केली.

पॉली उम्रीगर पुरस्कार विराट कोहलीला जाहीर
पॉली उम्रीगर पुरस्कार विराट कोहलीला जाहीर
मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड केली. त्याच वेळी स्टार अष्ट्रपैलू रविचंद्रन आश्विनची दिलीप सरदेसाई पुरस्कारासाठी निवड झाली. ८ मार्चला बंगळुरू येथे होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यामध्ये या दोन्ही खेळाडूंना गौरविण्यात येईल.
विशेष म्हणजे, याआधी दोन वेळा कोहलीने सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला आहे. २०११-१२ आणि २०१४-१५ या मोसमात हा पुरस्कार पटकावल्यानंतर तिसऱ्यांदा कोहली बीसीसायचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावेल. विशेष म्हणजे तीन वेळा या पुरस्कारावर नाव कोरणारा कोहली पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरेल.
दुसरीकडे, दिलीप सरदेसाई पुरस्कार दोन वेळा जिंकणारा आश्विनदेखील पहिलाच भारतीय ठरणार आहे. याआधी २०११ मध्ये भारत-वेस्ट इंडिज तीन सामन्यांच्या मालिकेत मालिकावीर ठरत पहिल्यांदा हा पुरस्कार पटकावला होता. यानंतर आश्विनने आपला धडाकाच लावला. त्याने गेल्याच वर्षी झालेल्या चार सामन्यांच्या मालिकेत पुन्हा मालिकावीराचा मान मिळवला. त्यात त्याने दोन शतकांसह १७ बळी मिळवताना दोन वेळा एकाच डावात पाच बळी मिळवण्याचा पराक्रम केला.
त्याच वेळी एम. राम, रामचंद्र गुहा आणि डायना एडलजी यांचा समावेश असलेल्या बीसीसीआय वार्षिक पुरस्कार समितीने राजिंदर गोयल आणि पद्माकर शिवलकर यांची सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली.
(क्रीडा प्रतिनिधी)
>मुंबई क्रिकेट संघ सर्वोत्तम
गतमोसमात देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकरांचा बोलबाला राहिला. विक्रमी ४१ व्यांदा रणजी करंडक पटकावल्यानंतर सीके नायडू ट्रॉफी आणि महिला प्लेट लीग गटातही मुंबईकरांचे वर्चस्व राहिले. तसेच, कुचबिहार ट्रॉफी, विजय मर्चंट ट्रॉफी आणि महिला एकदिवसीय एलिट गटामध्ये मुंबईकरांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या धडाक्याच्या जोरावर मुंबई क्रिकेट संघटनेची (एमसीए) मोसमातील सर्वोत्तम राज्य संघटना म्हणून निवड झाली.