People say anything, my goal is the Olympics! | लोक काहीही म्हणोत, माझे लक्ष्य ऑलिम्पिक!

लोक काहीही म्हणोत, माझे लक्ष्य ऑलिम्पिक!

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दुखापती आणि टीकाकारांशी संघर्ष करत असलेला आॅलिम्पिक विजेता कुस्तीगीर सुशीलकुमार याला टोकियो आॅलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलले गेल्याने पुन्हा आॅलिम्पिकमध्ये खेळण्याच्या आशा वाढल्या आहेत. लोकांना मी संपलोय अशी टीका करण्याची सवयच झाली आहे पण मला त्याच्याने काही फरक पडत नाही, मी टोकियो आॅलिम्पिकच्या दिशेने माझी तयारी सुरू केली आहे असे त्याने टीकाकारांना उत्तर दिले आहे. यासह आपल्या निवृत्तीच्या चर्चांना त्याने पूर्णविराम दिला आहे.
तो ७४ किलो वजन गटात खेळतो आणि या वजनगटात अद्याप भारतीय मल्लांनी आॅलिम्पिक कोटा मिळवलेला नाही. २०११ मध्येसुद्धा लोकांनी मला असेच कमी लेखले होते पण अशा टीकेला कसे सामोरे जायचे याची मला आता सवय झाली आहे असे म्हणत त्याने टीकाकारांना उत्तर दिले आहे.
आॅलिम्पिक पुढे ढकलले गेल्याने मला अधिक वेळ मिळाला आहे आणि अधिक वेळ म्हणजे मला चांगली तयारी करता येणार आहे, कुस्तीचा खेळ असा आहे की यात तर तुम्ही दुखापती टाळल्या, सराव चांगला केला, ध्येय बाळगले आणि त्या दिशेने तयारी केली तर तुम्ही यशस्वी होऊ शकता, आपण अजुनही दिवसातून दोन वेळा सराव करतो, हे करताना आपल्याला तंदुरुस्त ठेवायचाच माझा प्रयत्न आहे आणि दैवाने साथ दिली तर मी टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्रसुद्धा ठरेल असे त्याने म्हटले आहे. २०१९ च्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत चांगली सुरुवात केल्यावर सातत्य राखू न शकल्याने तो लवकर बाद झाला होता मात्र आता ती निराशा झटकून तो जोमाने तयारीला लागला आहे.
सुशील व नरसिंग यादव यांच्यादरम्यानचा वाद कुणापासून लपून राहिलेला नाही. चार वर्षांची बंदी संपल्यानंतर नरसिंगलासुद्धा आॅलिम्पिक पात्रतेचीे संधी देण्यात येईल असे भारतीय कुस्ती महासंघाने जाहीर केले आहे.
२०१६ च्या रियो आॅलिम्पिकसाठी सुशीलच्या ऐवजी नरसिंगची झालेली निवड भलतीच वादाची ठरली होती आणि न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले होते पण नरसिंग डोपींग चाचणीत दोषी आढळल्याने या दोघांचेही ते आॅलिम्पिक हुकले होते. सुशीलला ज्यावेळी नरसिंगसोबतच्या लढतीबाबत विचारले असता तो म्हणाला,‘जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू. आताच याबाबत काय सांगू.

नरसिंग यादवला दिल्या शुभेच्छा
दोन आॅलिम्पिक पदक विजेता असलेला हा ३६ वर्षीय मल्ल अद्याप टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरू शकलेला नाही. त्याने बीजिंग आॅलिम्पिकमध्ये कांस्य आणि लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. सुशीलचा प्रतिस्पर्धी नरसिंग यादवच्यासुद्धा आॅलिम्पिक पुढे ढकलल्याने आशा वाढल्या आहेत. नरसिंगवर डोपिंगमुळे असलेली चार वर्षांची बंदी येत्या जुलैमध्ये उठणार आहे. नरसिंगला पुन्हा नव्याने सुरुवात करताना अभिनंदन करताना आपल्या शुभेच्छा त्याने दिल्या आहेत.

Web Title: People say anything, my goal is the Olympics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.