भारताच्या अंतिम पंघालचा पहिल्याच सामन्यात पराभव, पण अजूनही पदकाची आशा, जाणून घ्या नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 20:08 IST2024-08-07T20:06:45+5:302024-08-07T20:08:05+5:30
Antim Panghal wrestling, India at Paris Olympics 2024: तुर्कस्थानच्या जेनिप येतगिल हिने अंतिम पंघालचा १०-० असा एकतर्फी पराभव केला.

भारताच्या अंतिम पंघालचा पहिल्याच सामन्यात पराभव, पण अजूनही पदकाची आशा, जाणून घ्या नियम
Antim Panghal wrestling, India at Paris Olympics 2024: भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बुधवारी मोठा धक्का बसला. भारताची महिला कुस्तीपटू अंतिम पंघाल आपल्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाली. विनेश फोगाटला अनपेक्षितरित्या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. त्यामुळे भारतीयांच्या सर्व आशा अंतिम पंघालवर होत्या. पण अंतिमला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तुर्कस्थानच्या जेनिप येतगिल हिने अंतिम पंघालचा १०-० असा एकतर्फी पराभव केला.
अंतिम पंघाल ५३ किलो वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात मैदानात उतरली होती. तिचा पहिलाच सामना तुर्कस्थानच्या जेनिप येतगिलशी होता. भारताकडून उतरलेली अंतिम पंघाल या सामन्यात एकदाही डोकं वर काढू शकली नाही. जेनिप अतिशय आक्रमकपणे चढाई करत होती. त्यामुळे बहुतांश वेळा अंतिम बॅकफूटवर दिसून आली. जेनिपने पूर्ण सामन्यात दबाव बनवून ठेवला आणि अखेर टेक्निकल सुपरियरिटीच्या जोरावर १०-० सामना जिंकला.
अजनूही पदक मिळवू शकते अंतिम पंघाल
अंतिम पंघालला पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असला तरी ती अद्याप पदकाच्या शर्यतीतून बाहेर गेलेली नाही. कारण कुस्तीत कांस्यपदकासाठी रेपचेज राऊंड ( Repechage in wrestling ) खेळला जातो. कुस्तीत स्पर्धेत जो खेळाडू फायनल खेळतो, त्याच्याशी हरलेल्या खेळाडूला रेपचेज राउंडमध्ये खेळण्याची संधी मिळते. जर जेनिप येतगिल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली, आपोआपच अंतिम पंघालला रेपचेड राउंड खेळण्याची संधी मिळेल.