पाकिस्तानने जिंकली पहिली कसोटी
By Admin | Updated: October 27, 2014 01:59 IST2014-10-27T01:59:28+5:302014-10-27T01:59:28+5:30
पाकिस्तानने आॅस्ट्रेलियापुढे विजयासाठी ४३८ धावांचे कठीण आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव ९१.१ षटकांत २१६ धावांत संपुष्टात आला

पाकिस्तानने जिंकली पहिली कसोटी
दुबई : डावखुरा फिरकीपटू जुल्फिकार बाबरची (५-७४) कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी व पदार्पणाची लढत खेळणाऱ्या लेगस्पिनर यासिर शाहचा (४-५०) अचूक मारा याच्या जोरावर पाकिस्तानने आज, रविवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाचा २२१ धावांनी पराभव करीत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
पाकिस्तानने आॅस्ट्रेलियापुढे विजयासाठी ४३८ धावांचे कठीण आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव ९१.१ षटकांत २१६ धावांत संपुष्टात आला. आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव आज चहापानानंतर संपला. बाबरने ३१.१ षटकांत ७४ धावांच्या मोबदल्यात पाच बळी घेतले. शाह याने २५ षटकांत ५० धावांच्या मोबदल्यात चार बळी घेत त्याला योग्य साथ दिली. धावांचा विचार करता पाकिस्तानचा आॅस्ट्रेलियाविरुद्ध हा मोठा विजय ठरला. यापूर्वी पाकिस्तानने नोव्हेंबर १९९५ मध्ये आॅस्ट्रेलियाचा सिडनी येथे ७४ धावांनी पराभव केला होता.
बाबरने आॅस्ट्रेलियाचा अखेरचा फलंदाज पीटर सिडलला बाद केल्यानंतर पाक संघातील सर्व सहकाऱ्यांनी आनंद साजरा केला. दोन्ही डावांत शतकी खेळी करणारा अनुभवी फलंदाज युनूस खान व पदार्पणात संस्मरणीय कामगिरी करणारा यासिर यांनी स्टंप हातात घेत आनंद साजरा केला. पाकला हा विजय साकारण्यासाठी संघर्ष करावा लागला.
काल, शनिवारच्या ४ बाद ५९ धावसंख्येवरून पुढे खेळताना आॅस्ट्रेलियाची उपाहारापर्यंत ७ बाद ११७ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने संघर्षपूर्ण खेळ करीत पाकिस्तानला विजयासाठी प्रतीक्षा करण्यास भाग पाडले. चहापानाला खेळ थांबला त्यावेळी आॅस्ट्रेलियाची
८ बाद १९६ अशी स्थिती होती. चहापानानंतर शाहने जॉन्सनला माघारी परतविले, तर बाबरने सिडलला बाद करीत पाकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जॉन्सनने १२७ चेंडूंना सामोरे जाताना ६१ धावा फटकाविल्या. त्यात सहा चौकार व एका षट्काराचा समावेश आहे. सिडलने ६६ मिनिटे खेळपट्टीवर तळ ठोकताना १५ धावा फटकाविल्या. स्टिव्हन स्मिथने संघर्षपूर्ण खेळी करताना अर्धशतक झळकाविले. त्याने १७५ चेंडूंमध्ये ५५ धावा फटकाविल्या. त्यात तीन चौकारांचा समावेश आहे.
दोन्ही डावांत (अनुक्रमे १०६ व नाबाद १०३) शतकी खेळी करणारा युनूस खान सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. बाबरने या लढतीत एकूण सात, तर शाहनेही पदार्पणाच्या कसोटीत सात बळी घेतले. (वृत्तसंस्था)