पाकचा आत्मविश्वास उंचावेल

By Admin | Updated: March 9, 2015 09:34 IST2015-03-09T01:05:48+5:302015-03-09T09:34:15+5:30

पाकिस्तानच्या कामगिरीचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयामुळे निश्चितच आनंद झाला. दक्षिण आफ्रिकेसारख्या

Pakistan's confidence will increase | पाकचा आत्मविश्वास उंचावेल

पाकचा आत्मविश्वास उंचावेल

पाकिस्तानच्या कामगिरीचे मला अजिबात आश्चर्य वाटले नाही, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयामुळे निश्चितच आनंद झाला. दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाचा पराभव केल्यामुळे पाक संघाचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळेल. या निकालामुळे लक्ष्याचा बचाव करण्यात पाकिस्तान संघ यशस्वी ठरतो, तर लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र हा संघ संघर्ष करतो, हे स्पष्ट झाले.
पुन्हा एकदा मिसबाह-उल-हक शिलेदाराप्रमाणे भासला. पाक संघाची स्थिती एकवेळ २ बाद १०० अशी होती. उमर अकमलबाबत कुठवर प्रतीक्षा करायची, असे म्हणण्याची वेळ आली आहे. अनुभव नाही, असे केव्हापर्यंत सांगायचे? तो सहा-सात वर्षांपासून संघात आहे. त्याच्या प्रतिभेबाबत साशंकता नाही, पण कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरत असलेल्या खेळाडूचे ओझे पाक संघ केव्हापर्यंत वाहणार ?
पाक संघात अखेर सरफराजला स्थान मिळाले. त्याला सलामीला खेळण्याची संधी मिळाली. त्याने डेल स्टेनविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने एकेरी धावा घेत धावफलक हलता ठेवला. एबोट व मोर्ने मोर्केलविरुद्धही त्याने प्रभावी कामगिरी केली. ड्युमिनीच्या एका षटकात तीन षट्कार ठोकत त्याने संघातील अन्य खेळाडूंना मार्ग दाखविला. इंजमाम, सईद अन्वर आणि एजाज अहमद यांच्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांमध्ये सरफराजप्रमाणे निर्भीड वृत्ती दिसली नाही. फॉर्मात नसलेल्या नासिर जमशेदच्या स्थानी सरफराजला खेळवण्याचा निर्णय योग्यच होता.
वहाब रियाजनेही माझे लक्ष वेधले. तो एक लढवय्या क्रिकेटपटू आहे. झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतकी खेळी केल्यानंतर त्याचा आत्मविश्वास उंचावला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत तो फर्स्ट चेंज म्हणून गोलंदाजीला आला. त्याने सुरुवातीपासून प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. आता पाक संघात चार वेगवान गोलंदाज आहेत. सोहेलचा (१३१ किलोमीटर) गोलंदाजीचा वेग कमी असला तरी तो धावा बहाल करीत नाही, ही बाब महत्त्वाची आहे. मिसबाहचे नेतृत्वही प्रभावित करणारे होते. बळी घेणे हाच एकमेव पर्याय आहे, याची त्याला चांगली कल्पना होती. वन-डेमध्ये नेतृत्व करण्याचा हाच योग्य मार्ग आहे.
दक्षिण आफ्रिकेला पाचव्या गोलंदाजासाठी काहीतरी योजना आखावी लागेल. ड्युमिनी केवळ फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्टीवरच उपयुक्त ठरू शकतो. त्याचसोबत लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला अडचण भासत आहे. मिलर, रोसो यांच्यामध्ये प्रतिभा आहे, पण दक्षिण आफ्रिका संघाची भिस्त यावेळी केवळ डिव्हिलियर्सवर अवलंबून आहे. ९० च्या दशकात भारतीय संघाची भिस्त ज्याप्रमाणे सचिनवर अवलंबून असायची तसेच.
भारतीय संघातर्फे मोहम्मद शमी व उमेश यादवच्या कामगिरीमुळे मला आनंद झाला. कोलकाता नाईट रायडर्ससाठी या दोन्ही गोलंदाजांसह काम केलेले आहे. संघातील खेळाडूंना मर्यादेमध्ये ठेवण्याचे श्रेय रवी शास्त्रीला जाते. अडचणीच्या स्थितीतही शास्त्री संघातील खेळाडूंना सर्वकाही सुरळीत असल्याचे सांगतो. मी शमी व उमेशला नेहमी वेगाने धावण्याचा सल्ला देतो. शमी व उमेश आता गोलंदाजी करताना वेगाने धावत असल्याचे तुमच्या निदर्शनास येईल. त्याचा त्यांच्या गोलंदाजीमध्ये फरक दिसून येतो. भारतीय संघाच्या कामगिरीचे आश्चर्य वाटले नाही. वन-डेमध्ये हा एक उत्तम संघ असल्याची कल्पना होती. भारतीय संघ आॅस्ट्रेलियात बऱ्याच दिवसांपासून आहे. हा संघ चॅम्पियनप्रमाणे खेळत आहे. अश्विनच्या रूपाने संघाकडे अनुभवी फिरकीपटू आहे. याव्यतिरिक्त भारताकडे पाच नियमित गोलंदाज आहेत. त्यामुळे हा सर्व फरक दिसून येत आहे. (टीसीएम)

Web Title: Pakistan's confidence will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.