दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयाने पाकिस्तानला ‘टॉनिक’
By Admin | Updated: March 17, 2015 23:47 IST2015-03-17T23:47:13+5:302015-03-17T23:47:13+5:30
भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी लागलेल्या पाकिस्तान संघाच्या जखमेवर विंडीजने सरशी साधत मीठ चोळले. त्यामुळे पाकिस्तानमध्ये चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया दिसून आल्या.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयाने पाकिस्तानला ‘टॉनिक’
भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी लागलेल्या पाकिस्तान संघाच्या जखमेवर विंडीजने सरशी साधत मीठ चोळले. त्यामुळे पाकिस्तानमध्ये चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया दिसून आल्या. खेळाडूंचे पुतळे जाळणे, प्रतिकात्मक शवयात्रा काढणे आणि घरावर दगडफेक करणे यासारखे प्रकारही घडले. सलग दोन पराभव स्वीकारावे लागल्यामुळे पाकिस्तान संघाला साखळीतच गाशा गुंडाळावा लागेल का ? असा प्रश्नही उपस्थित झाला.
पाकिस्तान संघातील खेळाडूंनी मात्र दडपण न बाळगता लढवय्या बाणा कायम राखला. पाकिस्तानने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाचा डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर २९ धावांनी पराभव करीत क्रिकेट विश्वाला पुन्हा दखल घेण्यास भाग पाडले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विजय पाक संघाला स्पर्धेत आगेकूच करण्यासाठी ‘टॉनिक’ ठरला.
मिसबाह-उल-हक :
मिसबाहने ८६ चेंडूंत ५६ धावांची खेळी करीत पाकला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली. मिसबाहने वन-डे क्रिकेटमध्ये पाच हजार धावांचा पल्ला गाठला.
सर्फराज अहमद
या स्पर्धेत प्रथमच संधी मिळालेल्या सर्फराज अहमदने ४९ धावांची आक्रमक खेळी केली. त्यानंतर त्याने यष्टिमागे विक्रमी सहा झेल घेतले.
नाणेफेकीचा कौल : पाकिस्तानचा कर्णधार मिसबाहने नाणेफेकीचा कौल मिळवित प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा घेतलेला निर्णय लाभदायक ठरला.
सोहेलचे ३३ वे षटक
दक्षिण आफ्रिकेच्या आशा डिव्हिलियर्सवर केंद्रित झाल्या असताना सोहेलने ३३ व्या षटकात त्याला सर्फराजकडे झेल देण्यास भाग पाडले आणि दक्षिण आफ्रिकेच्या विजयाच्या आशा मावळल्या.