पद्मिनीची विजयी आगेकूच
By Admin | Updated: October 8, 2014 03:18 IST2014-10-08T03:18:14+5:302014-10-08T03:18:14+5:30
बुद्धिबळ आॅलिम्पियाडमधील सुवर्णपदकविजेती भारताची पद्मिनी राऊत हिने जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सलग दुसरा विजय नोंदवला

पद्मिनीची विजयी आगेकूच
अमोल मचाले, पुणे
बुद्धिबळ आॅलिम्पियाडमधील सुवर्णपदकविजेती भारताची पद्मिनी राऊत हिने जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सलग दुसरा विजय नोंदवला. पहिल्या फेरीत विजयी प्रारंभ करणाऱ्या पद्मिनीने आज दुसऱ्या फेरीत क्रोएशियाच्या इवेकोविक तिहानावर मात करून आगेकूच केली. खुल्या गटातील भारतातर्फे विजेतेपदाचा दावेदार विदित गुजराथी यानेही सलग दुसरा विजय मिळवला. कालच्या पराभवातून सावरत पुण्याच्या आकांक्षा हगवणे हिने आज विजय नोंदवला. दोन्ही गटातील अव्वल मानांकित खेळाडूंना मात्र आज बरोबरीवर समाधान मानावे लागले.
अहमदनगर रोडवरील हयात हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटामध्ये तिसरे मानांकन असलेल्या वूमन ग्रॅण्डमास्टर पद्मिनीने ४३ चालींच्या लढतीत तिहानाचा पराभव केला. आतापर्यंत झालेल्या दोन्ही लढती जिंकणाऱ्या ओडिशाच्या पद्मिनीने दुसऱ्या फेरीअखेर २ गुणांची कमाई केली आहे.
पांढऱ्या मोहऱ्यांनिशी प्रारंभ करणाऱ्या पद्मिनीने राजासमोरील प्यादे हलवून सिसीलियन डिफेन्स पद्धतीने पहिली चाल खेळली. त्याला तिहानाने सिसीलियन पॉल्सन पद्धतीने योग्य उत्तर दिले. मात्र, नंतरच्या चालींमध्ये तिहानाला योग्य पद्धतीने बचाव करता आला नाही. ही संधी पद्मिनीने साधली. २३व्या चालीत तिने घोड्याचे बलिदान दिले आणि २४व्या चालीत हत्तीदेखील देऊ केला होता. मात्र, हत्ती देण्याची तिची ही चाल फसवी होती. तिहानाने हत्ती मारला असता तर पद्मिनीने तिला चेकमेट केले असते. हे लक्षात आल्यावर तिहानाने हत्ती मारण्याचा मोह टाळला. २८व्या चालीत एक्सचेंजमध्ये तिहानाचा हत्ती गेला. पद्मिनीने ४३वी चाल खेळल्यानंतर तिहानाचे प्यादे जाणार होते. यानंतर पद्मिनीकडे २ हत्ती व १ प्यादे शिल्लक होते. दुसरीकडे तिहानाकडे १ हत्ती आणि १ घोडा होता. ही स्थिती पाहून तिहानाने पराभव मान्य केला.
खुल्या गटात अव्वल मानांकित रशियाच्या व्लादिमीर फेडोसीव याला रोमानियाच्या डियाक बॉगडन डॅनिअल याने बरोबरीत रोखण्याची किमया साधली. दुसरे मानांकन असलेला नेदरलॅण्ड्सचा ग्रॅण्डमास्टर रॉबीन वॅन कॅ म्पेन याही आज बरोबरीवर समाधान मानावे लागले. चीनचा इंटरनॅशनल मास्टर जीन शी बाई याने २६ चालींअखेर त्याला बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला. मुलींच्या गटातील अव्वल मानांकित रशियाची अलेक्झांड्रा गोर्याचकिना सलग दुसरा विजय मिळवण्यात अपयशी ठरली.