‘आयएसएल’च्या उद्घाटनासाठी होणार दिग्गजांची मांदियाळी
By Admin | Updated: October 8, 2014 03:14 IST2014-10-08T03:14:46+5:302014-10-08T03:14:46+5:30
भारतातील पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय स्थराच्या तोडीची फुटबॉल लीग सुरू होण्यासाठी अवघे चार दिवस उरले आहेत.

‘आयएसएल’च्या उद्घाटनासाठी होणार दिग्गजांची मांदियाळी
कोलकाता : भारतातील पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय स्थराच्या तोडीची फुटबॉल लीग सुरू होण्यासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) संघ, त्यातील खेळाडू आणि फॉरमॅट याची माहिती सर्वांना असली तरी या लीगच्या यशाकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. या लीगमधील उत्सुकता आणखी वाढविण्यासाठी उद्घाटनाला अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर आणि मुकेश अंबानी या आपापल्या क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणात १२ आॅक्टोबरला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. बॉलिवूड स्टार प्रियांका चोपडा आणि वरूण धवन यांच्या नृत्याचा जलवाही यावेळी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. हा उद्घाटन समारंभ ४५ मिनिटे चालणार आहे.
आयएमजी रिलायन्स आणि स्टार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांची भागीदारी आहे. यामध्ये अभिषेक बच्चन (चेन्नई), रणबीर कपूर (मुंबई), सलमान खान (पुणे), जॉन अब्राहम (गुवाहाटी), वरुण धवन (गोवा) हे बॉलिवूड स्टार, तर सचिन तेंडुलकर (कोची), महेंद्रसिंग धोनी (चेन्नई), विराट कोहली (गोवा) आणि सौरव गांगुली (कोलकाता) या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. या स्पर्धेची पहिली लढत यजमान कोलकाता आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात होणार असल्याने ती पाहण्यासाठी एक लाख २० हजार प्रेक्षक क्षमता असलेले स्टेडियम खचाखच भरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. २००, ३०० आणि ४०० अशी तिकिटांची किंमत ठेवण्यात आली आहे.