ऑरेंज आर्मीचा धमाका
By Admin | Updated: June 30, 2014 08:35 IST2014-06-30T02:25:45+5:302014-06-30T08:35:44+5:30
पेनल्टीवर क्लास जान हंटेलारने नोंदविलेल्या गोलच्या जोरावर हॉलंडने मेक्सिकोचा 2-1 ने पराभव करीत विश्वकप फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

ऑरेंज आर्मीचा धमाका
>हॉलंड उपांत्यपूर्व फेरीत : मेक्सिकोवर 2-1 ने मात
फोर्टालेजा : इंज्युरी टाईममध्ये पेनल्टीवर क्लास जान हंटेलारने नोंदविलेल्या गोलच्या जोरावर हॉलंडने मेक्सिकोचा 2-1 ने पराभव करीत विश्वकप फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. हॉलंड संघ 88 व्या मिनिटार्पयत एका गोलने पिछाडीवर होता, पण त्यानंतर 3 मिनिटांच्या अंतरात हॉलंडने दोन गोल नोंदवित बाजी मारली. मॅक्सिकोतर्फे 48 व्या मिनिटाला डियोवानी दोस सांतोसने पहिला गोल नोंदविला. मेक्सिको संघ 1986 नंतर प्रथमच विश्वकप स्पर्धेत अंतिम 8 मध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरेल, असे वाटत होते, पण वेस्ले स्नायडरने 88 व्या मिनिटाला हॉलंडला बरोबरी साधून दिली. त्यानंतर हंटेलारने इंज्युरी टाईममध्ये पेनल्टीवर गोल नोंदवित संघाला विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले.
रफेल मार्केजने गोलक्षेत्रत आर्येन रोबेनला नियमबाह्य पद्धतीने रोखल्यामुळे पंचांनी हॉलंड संघाला पेनल्टी बहाल केली. सामन्याच्या 88 व्या मिनिटार्पयत मेक्सिको संघाने आघाडी कायम राखली होती. दोस सांतोसने 48 व्या मिनिटाला डाव्या पायाने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवित मेक्सिको संघाला आघाडी मिळवून दिली होती. कॅमरुनविरुद्धच्या लढतीत सांतोसने दोनदा चेंडूला गोलजाळ्यात पोहोचविले, पण त्याला ऑफसाईड ठरविले होते.
आतार्पयत विश्वकप स्पर्धेत मेक्सिकोचा स्टार ठरलेला गोलकिपर गुइलेरमो ओचोआने काही फटक्यांवर अप्रतिम बचाव केला. त्यात 57 व्या मिनिटाला स्टिफन डी व्रिजने मारलेल्या फटक्याचा समावेश आहे, पण स्नायडेर व हंटेलारला गोल नोंदविण्यापासून रोखण्यात तो अपयशी ठरला.
आता लुईस वान गालच्या संघाला शनिवारी सल्वाडोरमध्ये उपांत्यपूर्व फेरीत कोस्टा रिका किंवा ग्रीस यांच्यापैकी एका संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
हॉलंड संघाला मोक्याच्या क्षणी नायजेल डी जोंगला झालेल्या दुखापतीचा फटका बसला. त्याच्या स्थानी ब्रुनो मार्टिस इंडीला स्थान देण्यात आले. सामन्याच्या सुरुवातीला मेक्सिको संघाने आक्रमक खेळ केला.
26 व्या मिनिटाला त्यांनी चांगली चाल रचली,
पण त्यावर गोल नोंदविता आला नाही. (वृत्तसंस्था)