वन नाईट स्टार

By Admin | Updated: July 7, 2014 05:20 IST2014-07-07T05:20:45+5:302014-07-07T05:20:45+5:30

एका रात्रीत हिरो बनणे म्हणजे नक्की काय असते, हे नेदरलँडचा गोलरक्षक टीम क्रूल याला मिळालेली प्रसिद्धी पाहता सहजपणे ध्यानात येईल

One Night Star | वन नाईट स्टार

वन नाईट स्टार

साल्वाडोर : एका रात्रीत हिरो बनणे म्हणजे नक्की काय असते, हे नेदरलँडचा गोलरक्षक टीम क्रूल याला मिळालेली प्रसिद्धी पाहता सहजपणे ध्यानात येईल. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत झालेल्या अटीतटीच्या उपांत्यपूर्व सामन्यात या खेळाडूने पेनल्टी शूटआऊटमध्ये अफलातून कामगिरी करीत संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले. या जबरदस्त कामगिरीमुळे केवळ नेदरलँडच्या समर्थकांमध्येच नव्हे, तर जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या ओठावर क्रूलचे नाव आहे.
या घटनेतील दोन आश्चर्याच्या गोष्टी म्हणजे क्रूल पेनल्टी शूटआऊटच्या थरारावेळी बदली गोलरक्षक म्हणून मैदानावर आला होता. दुसरे म्हणजे, हा त्याच्यासाठी विश्वचषकातील पदार्पणाचा सामना होता. सामन्यामध्ये निर्धारित वेळेत आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेत गोलशून्य बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये निकालाची कोंडी फुटणार होती. फुटबॉलचा विश्वचषक म्हटले की, प्रत्येक सामन्यात खेळाडूवर दबाव असतो. त्यातच तो सामना उपांत्यपूर्व फेरीसारख्या ‘नॉक आऊट’ पद्धतीचा असेल, तर मग विचारूच नका. अशा वेळी सिंहाचे काळीज असणारा खेळाडूच टिकाव धरू शकतो. कोस्टारिकाविरुद्ध अतिरिक्त वेळेचा खेळ संपायला काही क्षण शिल्लक असताना नेदरलँडचे प्रशिक्षक लुईस वॉन गॉल यांनी नियमित गोलरक्षक जॅस्पर सिलीसन याच्याऐवजी क्रूलला मैदानावर पाठवण्याचा जुगार खेळला. अखेर गॉल यांचा हाच जुगार नेदरलँडसाठी ‘टर्निंग पॉर्इंट’ ठरला.
६.३ इंच अशी ताडमाड उंची लाभलेला २६ वर्षीय क्रूल जॅस्परला बदली गोलरक्षक म्हणून मैदानावर आला, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण, अशा निर्णायक क्षणी प्रशिक्षक गॉल असा काही अनपेक्षित बदल करतील, अशी कल्पना कुणालाच नव्हती. विशेषत: पेनल्टी किक वाचवण्याबाबत क्रूल कधीच आश्वासक गोलरक्षक नव्हता. मात्र, गॉल यांना आपल्या निर्णयावर आणि क्रूलवर विश्वास होता आणि हाच विश्वास क्रूलने पुरेपूर सार्थ ठरवला. या जिगरबाज गोलरक्षकाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ब्रायन रूईझ व मायकेल उमाना यांच्या किक प्रभावीरीत्या अडवल्या. त्याच्या या अफलातून कामगिरीमुळेच ४-३ अशा फरकाने बाजी मारून नेदरलँड अंतिम ४ संघांत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. या कामगिरीबरोबरच क्रूलने विश्वचषकातील कारकिर्दीचा स्वप्नवत प्रारंभ केला. (वृत्तसंस्था)

Web Title: One Night Star

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.