ऑलिम्पिक पदकविजेती पी.व्ही. सिंधू निवडणूक लढवणार, या पदासाठी मैदानात उतरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:18 IST2021-11-23T16:17:18+5:302021-11-23T16:18:00+5:30
P.V. Sindhu News: भारताला Badminton मध्ये दोन ऑलिम्पिक पदके मिळवून देणारी आघाडीच बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान बीडब्ल्यूएफ अॅथलिट कमिशनची निवडणूक सिंधू लढवणार आहे.

ऑलिम्पिक पदकविजेती पी.व्ही. सिंधू निवडणूक लढवणार, या पदासाठी मैदानात उतरणार
नवी दिल्ली - भारताला बॅडमिंटनमध्ये दोन ऑलिम्पिक पदके मिळवून देणारी आघाडीच बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान बीडब्ल्यूएफ अॅथलिट कमिशनची निवडणूक सिंधू लढवणार आहे. सध्याची विश्वविजेती असलेली सिंधू बालीमध्ये इंडोनेशिया ओपन सुपर १००० टुर्नामेंट खेळत आहे. सिंधू सहा पदांसाठी नामांकन देण्यात आलेल्या नऊ खेळाडूंपैकी एक आहे. अॅथलिट आयोगाच्या (२०२१ ते २०२५) कार्यकाळासाठीची निवडणूक १७ डिसेंबर रोजी टोटल एनर्जिक बीडब्ल्यूएफच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसोबत स्पेनमध्ये होणार आहे.
सध्या खेळत असलेल्या खेळाडूंपैकी केवळ पी.व्ही. सिंधूच पुन्हा एकदा निवडणुकीसाठी उभी राहिली आहे. तिने २०१७ मध्येही निवडणूक लढवली होती. ती या कार्यकाळासाठी निवडलेल्या सहा महिला प्रतिनिधींपैकी एक आहे. सिंधूसोबत इंडोनेशियाची महिला दुहेरीतील खेळाडू ग्रेसिया पॉलीसुद्धा असेल ती टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेती आहे. सिंधूला मे महिन्यात आयओसीच्या बिलिव्ह इन स्पोर्ट्स अभियानासाठी अॅथलिट आयोगामध्ये निवडण्यात आले होते.
पी. व्ही. सिंधू हिने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकून इतिहास रचला आहे. सिंधूने रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. तर यावर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने कांस्यपदक जिंकले होते. सिंधू ही ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी एकमेव भारतीय महिला क्रीडापटू आहे. तिला हल्लीच देशातील तिसरा सर्वोच्च सन्मान असलेला पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आळे होते.
५ जुलै १९९५ रोजी जन्मलेल्या सिंधूने २०१९ मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली बॅडमिंटनपटू ठरली होती. तसेच सिंधूला खेलरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.