आता बिंद्रा, नारंगला साधावा लागणार अचूक नेम
By Admin | Updated: August 7, 2016 21:55 IST2016-08-07T21:55:42+5:302016-08-07T21:55:42+5:30
देशातील एकमेव आॅलिम्पिक वैयक्तिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा आणि कास्यपदकप्राप्त गगन नारंग यांच्यावर लागून राहिली आहे.

आता बिंद्रा, नारंगला साधावा लागणार अचूक नेम
रियो डी जेनेरो : रियोत भारतीय नेमबाजांच्या खराब सुरुवातीनंतर आता १२५ कोटी भारतवासीयांचे लक्ष सर्वात मोठी पदकाची आशा आणि देशातील एकमेव आॅलिम्पिक वैयक्तिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा आणि कास्यपदकप्राप्त गगन नारंग यांच्यावर लागून राहिली आहे. भारताचे हे दोन स्टार नेमबाज सोमवारी येथे १0 मीटर एअर रायफल स्पर्धेत आपल्या आॅलिम्पिक मिशनला प्रारंभ करतील.
भारताने ३१ व्या आॅलिम्पिक स्पर्धेत आपले ११८ सदस्यीय पथक उतरवले आहे. त्यात विक्रमी १२ नेमबाजांचा समावेश आहे; परंतु पहिल्याच दिवशी महिला आणि पुरुष नेमबाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर आता सर्व आशा अभिनव आणि गगनवर आहेत.
आॅलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशीच सर्वात मोठी पदकाची आशा मानला जाणाऱ्या नेमबाज जीतू राय याने १0 मीटर एअर पिस्टल प्रकारात फायनलमध्ये पोहोचल्यानंतरही निराशा केली. जीतू फायनल राऊंडमध्ये पोहोचणाऱ्या आठ नेमबाजांत सर्वात आधी बाहेर होणारा नेमबाज होता आणि त्याचा पराभव हा भारतासाठी मोठा धक्कादायक होता. याशिवाय महिलांत अयोनिका पॉल आणि अपूर्वी चंडीला यांनीदेखील रायफल स्पर्धेत आपापल्या लढती गमावल्या.
अशा परिस्थितीत बिंद्रा आणि गगन यांच्यावर खूप दबाव असेल. नेमबाजीत लंडन आॅलिम्पिकनंतर खूप बदल झाले आहेत. याआधी क्वॉलिफाइंग आणि फायनलचे स्कोअर त्यात मोजले जात होते. आता मात्र स्कोअरची गणना फायनलमध्ये पोहोचलेल्या नेमबाजांचीच होती. नेमबाजाला फायनलमध्ये शून्यापासून सुरुवात करावी लागते आणि फायनलमध्ये चांगल्या कामगिरीनंतरच त्याला पदक मिळवता येते. बिंद्रा आणि गगनसाठी १0 मीटर एअर रायफल पुरुष स्पर्धा क्वॉलिफिकेशनमध्ये चांगली कामगिरी करणे हे सर्वात आधी पहिले लक्ष्य असेल. त्यात ५६ खेळाडूंचा सहभाग असेल.
भारतासाठी आॅलिम्पिक खेळात नेमबाजी हा खेळ पदकांच्या दृष्टीने नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे. गेल्या तीन आॅलिम्पिकमध्ये भारताने नेमबाजीत सातत्याने पदके जिंकली आहेत. अशात जीतूच्या पराभवानंतर आता आपला अखेरचा आॅलिम्पिक खेळणाऱ्या अभिनव बिंद्राचे यश हे महत्त्वपूर्ण ठरेल. भारताने लंडन आॅलिम्पिक २0१२ मध्ये एकूण ६ पदके जिंकली होती. त्यात दोन पदके नेमबाजांनी जिंकली होती.
गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात प्रशिक्षण घेणारा आणि भारतीय पथकाचा ध्वजवाहक तसेच आॅलिम्पिक स्पर्धेतील सद्भावना दूत बिंद्राकडून पदकाच्या सर्वाधिक अपेक्षा आहेत. २00८ बीजिंग आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा बिंद्रा हा देशाला आॅलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणारा एकमेव खेळाडू आहे. आपली पाचवी आणि अखेरची आॅलिम्पिक स्पर्धा खेळणाऱ्या बिंद्रा लंडनमधील अपयश विसरून नव्या जोमाने खेळणार आहे. लंडन आॅलिम्पिकमध्ये तो १६ व्या स्थानी होता. बिंद्राने २0१४ मध्ये सुवर्णपदक जिंकून आशियाई स्पर्धेतून निवृत्ती घेतली होती आणि रियोतदेखील असेच यश मिळवून आॅलिम्पिकमधून निरोप घेण्याची त्याची इच्छा असेल. माजी आॅलिम्पिक नेमबाज अंजली भागवत हिच्यानुसार बिंद्राने निश्चय केल्यास तो ते करून दाखवतो. आशियाई स्पर्धेत त्याने जे म्हटले होते ते करून दाखवले होते आणि रियोतही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती तो करू शकतो.
दुसरीकडे ३३ वर्षीय गगनकडून लंडन आॅलिम्पिकपेक्षा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. गगन लंडन आॅलिम्पिक २0१२ मध्ये पात्र ठरणारा पहिला भारतीय होता आणि त्याने या स्पर्धेत देशासाठी कास्यपदक जिंकले होते. या वेळेस पदकाचा रंग बदलण्याचा त्याचा प्रयत्न असेल.