‘आॅस्कर खुनी नाही’
By Admin | Updated: September 12, 2014 02:06 IST2014-09-12T02:06:54+5:302014-09-12T02:06:54+5:30
ब्लेड रनर’ म्हणून प्रसिद्ध असलेला धावपटू आॅस्कर पिस्टोरिअस याला द. आफ्रिकेच्या न्यायालयाने गुरुवारी निर्दोष ठरवले

‘आॅस्कर खुनी नाही’
प्रिटोरिया : ‘ब्लेड रनर’ म्हणून प्रसिद्ध असलेला धावपटू आॅस्कर पिस्टोरिअस याला द. आफ्रिकेच्या न्यायालयाने गुरुवारी निर्दोष ठरवले. त्याची प्रेयसी असलेली मॉडेल रिवा स्टिनकॅम्प हिच्या मृत्यूप्रकरणी आॅस्करची आज अंतिम सुनावणी झाली.
सहा महिन्यांपूर्वी रिवा हिचा मृतदेह संशयास्पदरीत्या आॅस्करच्या घरी सापडला होता. यावर न्या. थोकोजाईल मसिपा यांनी आरोपीचा हा पूर्वनियोजित कट होता हे सिद्ध होऊ शकत नाही. तसे कुठलेही पुरावे देखील नाहीत, असे नमूद केले. निकालादरम्यान २७ वर्षांचा पिस्टोरियस आपले डोके दोन्ही हातांनी लपवून स्तब्ध बसला होता.
२०१३ च्या ‘व्हेलेन्टाइन डे’च्या आदल्या दिवशी घडलेल्या या प्रकरणात आॅस्करला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ७ एप्रिलला या खटल्याची सुनावणी झाली आणि त्या वेळी आॅस्करने न्यायालयात रिवाच्या कुटुंबीयांची माफी मागितली. तो म्हणाला, की मला बोलण्याच्या दिलेल्या संधीचा मी फायदा उचलून प्रथम रिवाच्या कुटुंबीयांची माफी मागतो. सकाळी डोळे उघडल्यावर मला तुमचाच विचार येतो.
रिवाच्या जाण्याने तुम्हाला किती दु:ख झाले असेल, याचा विचार मी करूच शकत नाही. मी रिवावर प्रेम करत होतो. आॅस्कर नेमबाजीचा सराव करतानाचा व्हिडिओ दाखविण्यात आला. यात आॅस्कर कलिंगडाला टार्गेट करून निशाणा साधत होता. वकील गेरी नेल यांनी आॅस्करला या कलिंगडाच्या चिंधड्या उडाल्या, तशीच अवस्था रिवाच्या डोक्याची झाल्याचे निदर्शनास आणून दिले. यानंतर नेल यांनी मृतदेहाची छायाचित्रे न्यायालयात सादर केली.’ (वृत्तसंस्था)