नीता अंबानी आयओसीच्या सदस्यपदी
By Admin | Updated: August 5, 2016 03:49 IST2016-08-05T03:49:25+5:302016-08-05T03:49:25+5:30
आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांची रिओ आॅलिम्पिकच्या पूर्वसंध्येला गुरुवारी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या (आयओसी) आठ नव्या सदस्यांमध्ये निवड झाली

नीता अंबानी आयओसीच्या सदस्यपदी
रिओ : रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांची रिओ आॅलिम्पिकच्या पूर्वसंध्येला गुरुवारी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीच्या (आयओसी) आठ नव्या सदस्यांमध्ये निवड झाली.
आयओसीशी जुळलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. नीता अंबानी भारतातून आयओसीच्या एकमेव सदस्य आहेत. त्या ७० वर्षांच्या होईस्तोवर आयओसीत कायम राहतील. यंदा जून महिन्यात आयओसीच्या कार्यकारी बोर्डाने नीता अंबानी यांचे नाव सुचविले होते. आज येथे पार पडलेल्या आयओसीच्या १२९ व्या सत्रात आयओसीच्या सदस्यपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आठ नव्या सदस्यांसह आयओसीची सदस्य संख्या ९८ इतकी झाली.
नीता म्हणाल्या,‘माझी निवड हा भारतीय महिलांचा गौरव आहे. खेळ युवकांना दिशा देऊ शकतो अशी माझी भावना असून खेळाच्या माध्यमातून समुदाय, संस्कृती तसेच अनेक पिढ्यांचा संगम होऊ शकतो.’ (वृत्तसंस्था)