न्यूझीलंड महिला संघ उपांत्य फेरीत

By Admin | Updated: March 22, 2016 02:55 IST2016-03-22T02:55:26+5:302016-03-22T02:55:26+5:30

तीन वेळेचा विश्वविजेता आॅस्ट्रेलियाला ६ गड्यांनी धक्का देत न्यूझीलंडच्या महिला संघाने सलग तीन विजयांसह सोमवारी टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला

New Zealand women's team in semis | न्यूझीलंड महिला संघ उपांत्य फेरीत

न्यूझीलंड महिला संघ उपांत्य फेरीत

किशोर बागडे,  नागपूर
तीन वेळेचा विश्वविजेता आॅस्ट्रेलियाला ६ गड्यांनी धक्का देत न्यूझीलंडच्या महिला संघाने सलग तीन विजयांसह सोमवारी टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला.
सुरुवातीला श्रीलंका आणि आयर्लंड यांचा पराभव करणाऱ्या न्यूझीलंडने आज तिसऱ्या सामन्यात आॅस्ट्रेलियावर कमालीचे वर्चस्व गाजविले. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमच्या फिरकीला अनुकूल वाटणाऱ्या खेळपट्टीवर नाणेफेक गमावल्यानंतरही आॅस्ट्रेलियाला २० षटकांत ८ बाद १०३ धावांत रोखण्याची किमया साधली. त्यानंतर १६.२ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात १०४ धावा करून सामना जिंकला.
सूजी बेट्स व राचेल प्रिस्टय या सलामीच्या दोन्ही फलंदाजांनी ८ षटकांपर्यंत ५८ धावा ठोकून विजयाचा पाया रचला. २७ चेंडूंत सर्वाधिक ३४ धावांचे योगदान देणारी प्रिस्ट हिने ५ चौकार आणि १ षटकार हाणला. बेट्सने धावबाद होण्याआधी २५ चेंडूंत २३ धावा केल्या. सोफी डिव्हाईनने १७ चेंडूंत १७ आणि अ‍ॅमी सॅटरवेट हिने नाबाद १६ धावा केल्या. सारा मॅग्लेशन हिने ३ चौकारांसह १६ धावांचे उपयुक्त योगदान दिले. आॅस्ट्रेलियाचा वेगवान आणि फिरकी मारा न्यूझीलंडचा फलंदाजीतील झंझावात रोखण्यात कमालीचा अपयशी ठरल्यामुळे चुरस जाणवलीच नाही. त्याआधी आॅस्ट्रेलियाची सुरुवातही खराब झाली. संघाचे ५ फलंदाज केवळ ३० धावांत तंबूत परतले होते.
तथापि, एल्स पेरी (४८ चेंडूंत ४२ धावा, ३ चौकार, १ षटकार) आणि जेसी जोनासेन (२२ चेंडूंत २३ धावा, २ चौकार) यांनी सहाव्या गड्यासाठी ४९ धावांची भागीदारी करून संघाला २० षटकांत ८ बाद १०३ अशा सन्मानजनक स्थितीत आणले. उजव्या- डाव्यखुऱ्या फलंदाजीचा संगम साधणाऱ्या या जोडीने न्यूझीलंडच्या भेदक माऱ्याचा संयमाने सामना करीत शतक गाठून दिले. नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाने फलंदाजी घेतली खरी; पण त्यांचे
४ फलंदाज बाद झाले तेव्हा
फळ्यावर ४ षटके आणि चारच धावा लागल्या होत्या.
लेग कास्पेरिक हिने लागोपाठच्या चेंडूंवर एल्सी विनाली आणि एल्सी हिली यांना बाद केले. दोन दिवसांपूर्वी याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयात मोलाची भूमिका वठविणारी कर्णधार मेग लिनिंग हीदेखील
भोपळा न फोडताच धावबाद
झाली. कास्पेरिकने इरिन ओबोर्न हिचा बळी घेऊन आॅस्ट्रेलियाला आणखी एक धक्का दिला. एल्सी पेरीला साथ देणाऱ्या अ‍ॅलेक्स ब्लॅकवेलने (१०) त्रिफळाबाद होण्यापूर्वी पाचव्या गड्यासाठी २६ धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडकडून लेग कॅस्पेरिक हिने १३ धावांत ३ आणि इरिन बर्मिंघम हिने २३ धावांत २ गडी बाद केले.
>सोफीचा ५० बळींचा विक्रम
न्यूूझीलंडची मध्यम-जलद गोलंदाज सोफी डिव्हाईन हिने आज टी-२० सामन्यात ५० बळींचा टप्पा गाठला. तिने आॅस्ट्रेलियाची धोकादायक फलंदाज एल्सी पेरी हिचा अडथळा दूर करून ५०वा बळी मिळविला. अशी कामगिरी करणारी न्यूझीलंडची ती पहिलीच गोलंदाज बनली आहे.
२६ वर्षांच्या सोफीने २००६मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथे पदार्पण केले होते. अष्टपैलू खेळाडू, संघातील सर्वांत अनुभवी सिनिअर आणि उपकर्णधार अशी जबाबदारी सांभाळणारी सोफी हा न्यूझीलंड संघाचा आधारस्तंभ ठरला आहे.
> संक्षिप्त धावफलक
आॅस्ट्रेलिया : २० षटकांत ८ बाद १०३ धावा (एल्स पेरी ४२, जेस जोनासेन २३, बेथ मुनी १५, अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल १०, लेग कास्पेरेक १३/३, इरिन बर्मिंघम २३/२, सोफी डिव्हाईन २५/१).
न्यूझीलंड : १६.२ षटकांत ४ बाद १०४ धावा. (राचेल प्रिस्ट ३४, सुजी बेट्स २३, सोफी डिव्हाईन १७, अ‍ॅमी सॅटरवेट नाबाद १६, सारा मॅग्लेशन १६; क्रिस्टेन बिम्स, इरिन औसबर्न, लॉरेन चेटर प्रत्येकी १ बळी.)

Web Title: New Zealand women's team in semis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.