वर्ल्डकपमुळे टीम इंडियात संचारला नवा उत्साह
By Admin | Updated: February 26, 2015 00:56 IST2015-02-26T00:56:38+5:302015-02-26T00:56:38+5:30
मी गेल्या काही वर्षांत खूप क्रिकेट पाहिले. भारतीय चाहत्यांना विदेशात आपल्या संघाला प्रोत्साहन देतानादेखील पाहिले; पण रविवारी मेलबोर्न मैदानावर जे दृश्य दिसले

वर्ल्डकपमुळे टीम इंडियात संचारला नवा उत्साह
मी गेल्या काही वर्षांत खूप क्रिकेट पाहिले. भारतीय चाहत्यांना विदेशात आपल्या संघाला प्रोत्साहन देतानादेखील पाहिले; पण रविवारी मेलबोर्न मैदानावर जे दृश्य दिसले, ते पाहण्यासाठी सज्ज नव्हतोच. मैदानात किमान ८६ हजार प्रेक्षक असावेत. त्यांत ७६ हजार भारतीय होते. आम्ही एखाद्या सामाजिक विषयाचे साक्षीदार होत आहोत, असा भास होत होता.
असे का घडले? भारतीय आॅस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत यामुळे की आर्थिक सुबत्ता वाढल्याने भारतीय लोकांना आॅस्ट्रेलियात जाणे परवडण्यासारखे होते किंवा देशप्रेम वाढल्यामुळे हे लोक तेथे पोहोचलेत? २०११च्या वर्ल्डकपमध्ये ईडन गार्डनवर ६५ हजार प्रेक्षक होते. काही भारतीय खेळाडूंसाठी ही सर्वांत मोठी प्रेक्षकसंख्या होती; पण मेलबोर्नने उपस्थितीचे सर्व विक्रम मोडले.
टीम इंडियात अचानक उत्साहाचा संचार झाला. कसोटी मालिका आणि तिरंगी मालिका गमावल्यामुळे विश्वचषकातही अपयशाची शृंखला सुरू राहील, असे वाटत होते. संघ थकलेला असावा किंवा एकाच प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध वारंवार खेळल्याने असे घडले असावे. काही वर्षांआधी भारत दौऱ्यावर आलेल्या आॅस्ट्रेलिया संघाला असाच खेळ करताना मी पाहिले आहे. संघाला ब्रेकचा लाभ झाला किंवा वर्ल्डकपमुळे संघात नवा उत्साह संचारला असावा. आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे नसल्याने टीम इंडिया उत्साही असावा. काहीही असो, टीम इंडियात फिल्डिंगमधील जोश, फलंदाजीतील सकारात्मक वृत्ती आणि गोलंदाजीत शिस्त आली. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध दयामाया दाखविण्याची वृत्ती संपली. सर्व समस्या आणि उणिवा डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप व्हावी इतक्या चुटकीसरशी संपुष्टात आल्याचे दिसत आहे.
धवनने दाखवून दिले की, त्याला खेळविण्याच्या बाजूने अनेक जण का होते? तो लयीत असेल तर एकट्याच्या बळावर सामना जिंकण्याची ताकद बाळगतो. त्याने शिस्तबद्ध फलंदाजी करीत असे केलेदेखील. शिस्तीचा संचार झालेला नवा धवन आम्हाला दिसला. अखेरपर्यंत क्रिझवर थांबण्यासाठी त्याने स्वत:ला सज्ज केले असावे, असेही असू शकते. जेवढे चेंडू तो सोडून द्यायचा, तितका सहज खेळत होता. विराट कोहलीनेदेखील उणिवा मागे टाकल्या. स्टार स्पोर्ट्सने जो पिच मॅप दाखविला त्यानुसार पाकच्या गोलंदाजांनी त्याला इंग्लंडच्या गोलंदाजांसारखे अलगद जाळ्यात ओढणारे चेंडू टाकले; पण विराटने ते सोडून दिले, कारण क्रिझवर थांबलो की धावा येतील, हे त्याला ठाऊक असावे. सुरेश रैना आणि अजिंक्य रहाणे या आणखी दोन फलंदाजांची बॅट चांगलीच तळपली. रैनाच्या फटक्यात ताकद होती, तर अजिंक्यचे फटके क्लासिक होते. या दोघांना खेळताना पाहून घरच्या वातावरणात ते फलंदाजी करीत असल्याचा भास होत होता. खरे तर संघात उत्साह संचारल्याचा हा परिणाम होता. (टीसीएम)