नेदरलँड महिला हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत
By Admin | Updated: June 9, 2014 03:41 IST2014-06-09T03:41:16+5:302014-06-09T03:41:16+5:30
आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त नेदरलँड संघाने येथे क्योसेरा स्टेडियममध्ये आॅस्ट्रेलियावर २-0 असा विजय मिळवतानाच महिला हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला

नेदरलँड महिला हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत
द हेग (नेदरलँड) : आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त नेदरलँड संघाने येथे क्योसेरा स्टेडियममध्ये आॅस्ट्रेलियावर २-0 असा विजय मिळवतानाच महिला हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. किम लॅमर्सने काल ५७ व्या मिनिटाला गोल करताना संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. नाओमी एस.ने ६५ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. हा नेदरलँडचा विजयी गोल ठरला.
या विजयाबरोबरच नेदरलँडचे ४ सामन्यांत १२ गुण झाले असून ‘अ’ गटात त्यांनी उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. आॅस्ट्रेलियाचे ९, दक्षिण आफ्रिकेचे ७ आणि न्यूझीलंडचे ६ गुण झाले आहेत.
बेल्जियमवर ४-२ अशी मात करणारा दक्षिण कोरिया तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. या स्पर्धेत बेल्जियमने सर्वच्या सर्व चारही सामने गमावले आहेत. चियोन युन बी आणि पार्क मि हुन यांनी प्रत्येकी २ गोल करताना कोरियाला विजय मिळवून दिला. बेल्जियमकडून जिल बुन आणि एलिक्स गर्नियर्सने प्रत्येकी १ गोल केला.
अन्य लढतीत जपानवर ४-१ ने विजय मिळवला. जपानचा चार सामन्यात एक गुण आहे. न्यूझीलंडसाठी अनिता पंतने दोन, तर सोफी कॉक्स आणि कॅटी ग्लीन यांनी प्रत्येकी १ गोल केला. जपानसाठी एकमेव गोल युरी नागाई यांनी केला. (वृत्तसंस्था)