नेदरलँडची कुल व्हिक्टरी
By Admin | Updated: July 7, 2014 05:24 IST2014-07-07T05:24:44+5:302014-07-07T05:24:44+5:30
गोलकिपर टीम क्रुलच्या शानदार कामगिरीच्या जोरावर गतउपविजेत्या नेदरलँडने काल, शनिवारी कोस्टारिकाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ ने पराभव केला

नेदरलँडची कुल व्हिक्टरी
सॅल्वाडोर : गोलकिपर टीम क्रुलच्या शानदार कामगिरीच्या जोरावर गतउपविजेत्या नेदरलँडने काल, शनिवारी कोस्टारिकाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ ने पराभव केला आणि फिफा विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत नेदरलँडला अर्जेंटिनाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या नेदरलँड संघाला कोस्टारिकाने कडवी झुंज दिली. निर्धारित व अतिरिक्त वेळेत गोलफलक कोराच होता. निकालाची कोंडी फोडण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. नेदरलँडचे प्रशिक्षक लुई वान गाल यांनी पेनल्टी शूटआऊटची शक्यता लक्षात घेता क्रुलला अतिरिक्त वेळेत मैदानात उतरविले. क्रुलने शानदार कामगिरी करताना कोस्टारिकाचा कर्णधार ब्रायन रुईज व मायकल उमाना यांना पेनल्टी शूटआऊटमध्ये गोल नोंदविण्यापासून रोखले. वान पर्सी, अर्जेन रॉबेन, वेस्ले स्नायडर व डीर्क कुयेत यांनी चमकदार कामगिरी करीत नेदरलँडला ४-३ ने विजय मिळवून दिला.
नेदरलँडला बुधवारी साओ पाउलो येथे खेळल्या जाणाऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत अर्जेंटिनाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. अर्जेंटिनाने बेल्जियमचा १-० ने पराभव करीत अंतिम चार संघांत स्थान मिळविले. उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत मंगळवारी ब्राझीलला जर्मनीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. नेदरलँड संघाने यापूर्वी तीन वेळा विश्वकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे, पण त्यांना अद्याप जेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही.
नेदरलँडचा स्ट्रायकर पर्सीने क्रुलची प्रशंसा करताना म्हटले की, ‘क्रुलची कामगिरी उल्लेखनीय ठरली. क्रुलने पेनल्टी रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, याची आम्हाला चांगली कल्पना आहे.’ (वृत्तसंस्था)